पुढारी वृत्तसेवा
कोळाचे पोहे हा कोकणी पदार्थ आहे. घरी पाहुणे आल्यास हा पदार्थ आवर्जून बनवला जातो.
हा पदार्थ खूप झटपट तयार होतो. यासाठी पोहे भिजवण्याची गरज नसते, न भिजवता ते वापरले जातात.
फक्त नारळाच्या दुधाची (कोळाची) तयारी करून ठेवली, की हा पदार्थ लगेच बनतो. नारळाच्या दुधामुळे हे पोहे चवीला रुचकर आणि चविष्ट लागतात.
कोळाचे पोहे चवीला चटपटीत, आंबट, गोड आणि तिखट असतात.
नारळाचा कोळ कसा बनवायचा?
नारळाचे दूध काढून घ्यावे, त्यामध्ये गूळ आणि थोडं पाणी घालावे. नारळाचे दूध काढण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे तयार 'कोकोनट मिल्क' मिळते, ते वापरले तरी चालते. चवीसाठी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घालून हा कोळ तयार करा.
फोडणी आणि सर्व्ह करण्याची पद्धत
फोडणीची तयारी: एका लहान कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि लाल मिरच्या (आवडीनुसार कढीपत्ताही घालू शकता) घालून खमंग फोडणी तयार करा.
कोळामध्ये फोडणी: ही गरमागरम फोडणी लगेचच तयार केलेल्या नारळाच्या कोळात ओतून मिक्स करा.
एका सर्व्हिंग डिशमध्ये कोरडे पोहे घ्या. या कोरड्या पोह्यांवर तयार केलेला आणि फोडणी दिलेला नारळाचा कोळ व्यवस्थित ओता.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाच्या किसाने सजवा. गरमागरम नाश्ता म्हणून लगेच खा.