पुढारी वृत्तसेवा
तुम्ही घरी फ्रेंच फ्राईज बनवता, पण ते हॉटेलसारखे कुरकुरीत होत नाहीत का? काळजी करू नका, काही साध्या चुका सुधारून तुम्ही घरीही उत्तम फ्राईज बनवू शकता.
फ्रेंच फ्राईजसाठी बटाट्याची निवड अत्यंत महत्त्वाची असते. खूप जास्त पाणी किंवा स्टार्च असलेले बटाटे वापरणे टाळावे. मध्यम आकाराचे आणि स्वच्छ बटाटेच निवडावेत.
बटाट्यांवर कोणत्याही प्रकारचे डाग किंवा काळे चट्टे नसावेत. ताजे आणि उत्तम दर्जाचे बटाटेच तुमच्या पदार्थाला चविष्ट बनवतात.
बटाट्याचे काप ना खूप जाड असावेत, ना खूप बारीक. जास्त जाड तुकडे कच्चे राहू शकतात, तर खूप बारीक तुकडे तेलात जळतात. सर्व तुकडे एकसारख्या आकारात कापल्यास ते व्यवस्थित तळले जातात.
बटाटे कापल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करणे सर्वात महत्त्वाचे आहे. ओले बटाटे तेलात टाकल्यास ते कुरकुरीत होत नाहीत. कापलेले तुकडे स्वच्छ सुती कपड्याने पुसून पूर्णपणे कोरडे करून घ्यावेत.
तेल खूप गरम किंवा खूप थंड नसावे. तेल मध्यम आचेवर तापवावे, जेणेकरून फ्राईज बाहेरून कुरकुरीत आणि आतून व्यवस्थित शिजतील.
सर्व बटाटे तेलात सोडण्यापूर्वी, एक-दोन तुकडे टाकून तेल योग्य तापमानावर असल्याची खात्री करा. यामुळे तुमची रेसिपी कधीच बिघडणार नाही.
अनेकजण एकदा वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरतात, ज्यामुळे फ्राईजची चव बिघडते आणि ते आरोग्यासाठीही हानिकारक असते. नेहमी ताज्या तेलाचा वापर करा.
फ्रेंच फ्राईज अधिक कुरकुरीत करण्यासाठी कापल्यानंतर बटाट्याचे तुकडे १०-१५ मिनिटे बर्फाच्या थंड पाण्यात ठेवावेत. त्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करून तळावेत. मिळणारा रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.