Cinnamon: खरी दालचिनी कशी ओळखायची? सोपी ट्रिक

पुढारी वृत्तसेवा

आपण रोज वापरत असलेली दालचिनी खरंच अस्सल आहे का, याचा कधी विचार केला आहे का?

अहमदाबादमधील न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दालचिनी आणि कॅसिया यातील फरक स्पष्ट केला आहे.

त्यांच्या मते, सुमारे ९० टक्के लोक खरी दालचिनी वापरत असल्याचे समजतात; मात्र प्रत्यक्षात ते कॅसियाचा वापर करत असतात.

दोन्ही दिसायला जवळपास सारखेच असल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. दोन्हींचा रंग लालसर-तपकिरी असून ते एकसारखे दिसतात.

मात्र, त्यांच्या भौतिक गुणधर्मांपासून रासायनिक संरचनेपर्यंत अनेक फरक आहेत. त्यामुळे दालचिनीची निवड करताना केवळ तिचा रंग पाहणे पुरेसे नाही.

बाजारात 'दालचिनी' या नावाने मोठ्या प्रमाणावर विकली जाणारी दालचिनी प्रत्यक्षात कॅसिया असू शकते, असे किरण कुकरेजा यांनी सांगितले.

कॅसियामध्ये कौमारिन या नैसर्गिक रासायनिक घटकाचे प्रमाण तुलनेने जास्त असते. त्याचे मोठ्या प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अस्सल सिलोन दालचिनी कशी ओळखाल?

खरी दालचिनी म्हणजे सिलोन दालचिनी असे म्हटले जाते. त्याच्या काड्या जाड आणि कडक नसून अनेक पातळ, कागदासारख्या थरांनी तयार झालेल्या असतात.

त्यांची रचना नाजूक आणि अनेक स्तरांची असते. याउलट कॅसियाच्या काड्या तुलनेने जाड, कठीण आणि कमी थरांच्या असतात.

सिलोन दालचिनीमध्ये कौमारिनचे प्रमाण कॅसियाच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे नियमित वापरासाठी दालचिनीची निवड करताना सिलोन दालचिनीला प्राधान्य देणे योग्य ठरू शकते.

त्यामुळे दालचिनी खरेदी करताना केवळ तिचा रंग किंवा सुगंध पाहू नका. जाड आणि कडक काडीऐवजी पातळ, नाजूक आणि अनेक थर असलेल्या काड्या आहेत का, हे तपासा.