Mango: आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला आहे की रसायनाने? FSSAI ने सांगितलं तो कसा ओळखावा?

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की बाजारात आंबा, केळी आणि पपई यांसारख्या फळांची मोठी आवक होते.

मात्र, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा ही फळे कृत्रिमरित्या आणि धोकादायक रसायनांचा वापर करून पिकवली जातात.

या गंभीर बाबीची दखल घेत भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कडक इशारा दिला आहे.

फळे पिकवण्यासाठी प्रतिबंधित रसायनांचा वापर करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

FSSAI ने आरोग्यासाठी धोकादायक असेलेले, परंतू फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इथिलीन गॅसचा वापर करून फळे पिकवणे सुरक्षित मानले जाते.

स्ट्रिप पेपर टेस्ट

गोदामांमध्ये किंवा फळबाजारांमध्ये कॅल्शियम कार्बाइडचा वापर झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी 'स्ट्रिप पेपर टेस्ट' करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कशी होते चाचणी?

एका बंद डब्यात फळे ठेवून त्यात ओल्या निदर्शक कागदाची पट्टी ठेवली जाते. जर या पट्टीचा रंग वेगाने बदलला, तर त्या फळांवर रसायनाचा वापर झाला असल्याचे सिद्ध होते.

जर एखाद्या व्यापाऱ्याकडे कॅल्शियम कार्बाइड किंवा प्रतिबंधित रसायने आढळली, तर त्याच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

रंगावरून ओळखा

नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा पूर्णपणे पिवळा नसून त्यावर कुठे हिरवे ठिपके असू शकतात. रासायनिक आंबा पूर्णपणे एकसारखा पिवळाधमक दिसतो.

नैसर्गिक आंब्याला एक विशिष्ट गोड सुगंध असतो. केमिकलने पिकवलेल्या आंब्याला वास नसतो किंवा उग्र रासायनिक वास येतो.

नैसर्गिक आंब्याचा गर लालसर पिवळा असतो, तर रासायनिक आंब्याचा गर आतून पांढरट किंवा फिका पिवळा असतो.