Banana: केळी घेताना नैसर्गिक आहेत की केमिकलने पिकवलेली कसे ओळखावे?

पुढारी वृत्तसेवा

केळ हे प्रत्येकाच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. मात्र, बाजारातील पिवळीधमक केळी आरोग्यासाठी फायदेशीर असतीलच असे नाही.

सध्या फळे लवकर पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी कशी ओळखावी हे सांगितलं आहे.

नैसर्गिक की रासायनिक? असे ओळखाल

जर केळ्याचा मधला भाग गडद पिवळा असेल, परंतु देठ आणि खालचे टोक हिरवे दिसत असेल, तर समजून जा की ते केमिकल वापरून पिकवले आहे.

सहसा अशी फळे कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवली जातात, ज्यामुळे ती बाहेरून पिकलेली दिसतात पण आतून कच्ची असू शकतात.

नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळ्याचे देठ किंवा टोकाचा भाग हलका काळा किंवा तपकिरी पडलेला असतो. याचा अर्थ असा की, फळ झाडावर किंवा नैसर्गिक प्रक्रियेतून पूर्ण पिकलेले असून ते खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यामुळे पोटात जळजळ होणे, तीव्र वेदना, जुलाब आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

FSSAI ने भारतात फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

त्याऐवजी, सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'इथिलीन गॅस'चा मर्यादित वापर करण्यास परवानगी दिली आहे, ज्यामुळे मानवी आरोग्याला कोणतीही इजा होत नाही.