मोहन कारंडे
राज्यात यापुढे डिजिटल सात-बारा उताऱ्याला कायदेशीर संरक्षण मिळणार असून त्यासाठी तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज नसेल.
अवघे १५ रुपये भरून हा दाखला कोणालाही काढता येणार आहे. शासनाने याविषयीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम १९७१ अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
डिजिटल स्वाक्षरीने (क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांकासह) मिळणारे गाव नमुना ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बॅंकिंग, कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर व वैध असतील.
या उताऱ्यावर तलाठ्याच्या सहीची किंवा स्टॅम्पची गरज नसेल.
अवघ्या १५ रुपयांत कसा मिळवायचा सात-बारा?
नागरिकांना आता घरबसल्या किंवा सेतू केंद्रावरून अधिकृत सातबारा मिळणार आहे.
नागरिकांना https://bhulekh. mahabhumi. gov.in/ या संकेतस्थळावर ७/१२ उतारा मोफत पाहता येईल, परंतु तो केवळ माहितीपुरताच वापरता येईल.
अधिकृत कामासाठी डिजिटल स्वाक्षरीत उतारा पाहिजे असल्यास १५ रुपये शुल्क ऑनलाइन भरा आणि उतारा काढा.