Apple Health Tips: सफरचंद सालीसकट खावे की साल काढून? पाहा योग्य पद्धत

पुढारी वृत्तसेवा

आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काही खातो, त्यातून आपल्या शरीराला विविध पोषक तत्वे मिळतात आणि आपण निरोगी राहतो.

पोळी-भाजी किंवा डाळ-भात यांसोबतच, निरोगी शरीरासाठी फळे खाणेही आवश्यक आहे. म्हणूनच लोक त्यांच्या दैनंदिन आहारात फळांचा समावेश करतात.

सफरचंद हे असेच एक फळ आहे जे अनेक आजार रोखण्यास मदत करू शकते, पण तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? सफरचंदाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते कसे खावे, हे बहुतांश लोकांना माहित नसते.

अनेक फळे कशी खावीत याबद्दल संभ्रम असतो. काहीजण म्हणतात की ती सालीसकट खावीत, तर काहीजण त्यांची साल काढून खाणे पसंत करतात.

सफरचंद हे असेच एक फळ आहे आणि बहुतेक लोक ते साल न काढता खातात. मात्र, तज्ञांच्या मते, सफरचंद नेहमी साल काढूनच खावे.

साल ही एक संरक्षक आहे, जी हानिकारक घटकांना फळाच्या आत किंवा बियांपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. काही खाद्यपदार्थ मात्र सालीसकट खाणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ, द्राक्षे पूर्ण खाल्ली पाहिजेत.

दररोज सफरचंद खाल्ल्याने आजार दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्स असतात.

ही पोषक तत्वे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. म्हणूनच दररोज सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.