पुढारी वृत्तसेवा
कपडे धुताना अनेकांचा असा समज असतो की, जास्त फेस म्हणजे जास्त स्वच्छता. याच विचारामुळे वॉशिंग मशीन किंवा बादलीत गरजेपेक्षा जास्त डिटर्जंट टाकले जाते.
पण तुम्हाला माहीत आहे का की, जास्त सर्फ कपडे स्वच्छ करण्याऐवजी ते खराब करू शकतो?
खरे तर, जास्त सर्फ टाकल्यामुळे उरलेले केमिकल कपड्यांवर एक थर तयार करून चिकटून राहते.
हे केमिकल धूळ आणि मातीला आकर्षित करते, ज्यामुळे कपडे रखरखीत आणि कडक होऊ लागतात. यामुळे त्वचेला खाज किंवा ॲलर्जी होण्याचा धोकाही निर्माण होतो.
म्हणूनच, प्रत्येक प्रकारच्या कपड्यानुसार डिटर्जंटचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. कपडे धुताना नक्की किती डिटर्जंट वापरावे, याचे अचूक प्रमाण जाणून घेऊया.
हाताने कपडे धुताना किती डिटर्जंट वापरावे?
'ऑल सीझन्स गार्मेंट केअर'नुसार, हाताने कपडे धुताना चूक होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपण अंदाजाने सर्फ टाकतो. यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता
छोटा टब (सुमारे ४–८ लिटर पाणी): कपडे धुताना साधारण १ टी-स्पून (लहान चमचा) लिक्विड किंवा पावडर डिटर्जंट वापरा.
मध्यम टब (१०–१५ लिटर पाणी): कपडे धुताना साधारण २ टी-स्पून डिटर्जंटचा वापर करा.
मोठा टब: कपडे धुताना १ टेबलस्पून (मोठा चमचा) सर्फ टाका. जर कपडे मऊ असतील, तर हे प्रमाण अर्धे करा.
महत्त्वाची टीप: डिटर्जंट नेहमी पाण्यात विरघळवून मगच कपडे टाकावेत. थेट कपड्यांवर पावडर टाकल्यास त्यावर डाग पडण्याचा धोका वाढतो.