Pressure Cooker Guide for Dal: हॉटेलसारखी परफेक्ट डाळ शिजवण्यासाठी कुकरच्या किती शिट्ट्या हव्यात?
पुढारी वृत्तसेवा
भारतीय जेवणात डाळ हा प्रथिनांचा सर्वात मुख्य स्त्रोत मानला जातो. प्रत्येक घरात दररोज कोणत्या ना कोणत्या डाळीचे वरण किंवा आमटी केली जाते.
मात्र, अनेकदा डाळ शिजवताना गृहिणींची मोठी पंचाईत होते. कधी कुकरच्या शिट्ट्या होऊनही डाळ दगडासारखी निबर राहते, तर कधी अति शिजल्यामुळे तिचा लगदा होतो.
डाळीचा पोत आणि चव हॉटेलसारखी हवी असेल, तर कोणत्या डाळीला किती शिट्ट्या द्याव्यात याचे एक शास्त्र आहे.
१. तुरीची डाळ
तुरीची डाळ व्यवस्थित शिजवण्यासाठी ती किमान १५-२० मिनिटे कोमट पाण्यात भिजत घालणे उत्तम ठरते.
किती शिट्ट्या: डाळ भिजवलेली असेल तर २ ते ३ शिट्ट्या पुरेशा आहेत.
पहिली शिट्टी मोठ्या आचेवर होऊ द्यावी, त्यानंतर गॅस बारीक करून १-२ शिट्ट्या घेतल्यास डाळ आतपर्यंत मऊ शिजते.
२. मुगाची डाळ
मुगाची डाळ अति शिजल्यास लगेच तिचे 'पेस्ट'मध्ये रूपांतर होते.
किती शिट्ट्या: फक्त १ ते २ शिट्ट्या.
दुसरी शिट्टी होणार इतक्यात गॅस बंद करावा आणि कुकरमधील वाफ स्वतःहून बाहेर पडू द्यावी. यामुळे डाळ अती शिजत नाही.
३. चणा डाळ
चणा डाळ न भिजवता शिजवल्यास गॅस आणि वेळ दोन्ही वाया जाण्याची शक्यता असते.
किती शिट्ट्या: डाळ किमान १ तास आधी भिजत ठेवावी. त्यानंतर मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्ट्या करून घ्याव्यात.
चणा डाळ शिजवताना कुकरमध्ये चिमूटभर तेल टाकावे, जेणेकरून शिट्टी होताना डाळीचे पाणी बाहेर येणार नाही.
Chana Dal Benefits | pinterest
४. उडीद डाळ आणि राजमा
अख्खा उडीद किंवा राजमा यांसारखी कडधान्ये शिजवण्यासाठी अधिक मेहनतीची गरज असते.
किती शिट्ट्या: रात्रभर भिजवूनही याला ६ ते ७ शिट्ट्यांची गरज लागते.
पहिल्या दोन शिट्ट्या मोठ्या आचेवर झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करावी आणि साधारण १५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. यामुळे राजमा किंवा उडीद लोण्यासारखा मऊ शिजतो.