पुढारी वृत्तसेवा
केरोसीन अत्यंत ज्वलनशील असल्याने छोटासा अपघातही मोठा स्फोट घडवू शकत होता. त्यामुळे सैन्याने अशा ट्रकच्या मागे “Horn Please. On Kerosene” असा इशारा लिहायला सुरुवात केली.
याचा अर्थ असा की, ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न वाजवून चालकाला सावध करा. अचानक पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. कालांतराने “On Kerosene” हे शब्द छोटेखानी “OK”मध्ये बदलले आणि पुढे “Horn OK Please” हा प्रसिद्ध संदेश तयार झाला.
या वाक्याबाबत आणखी एक रंजक सिद्धांत सांगितला जातो. टाटा ऑइल मिल्स कंपनीचा “OK” नावाचा डिटर्जंट ब्रँड त्या काळात लोकप्रिय होता.
या ब्रँडचे कमळाचे चिन्ह ट्रकवर जाहिरातीसाठी रंगवले जात असे. ट्रकच्या एका बाजूला “Horn” आणि दुसऱ्या बाजूला “Please” असे आधीच लिहिलेले असायचे. मधोमध “OK” आणि कमळाचे चिन्ह रंगवल्याने पूर्ण वाक्य “Horn OK Please” असे दिसू लागले.
पुढे हे वाक्य ट्रक संस्कृतीचा कायमस्वरूपी भाग बनले. आज “Horn OK Please” हे केवळ वाहतूक सुरक्षिततेसाठीचे वाक्य राहिलेले नाही, तर भारतीय रस्ते संस्कृतीचे प्रतीक बनले आहे.
ट्रक चालक अनेक आठवडे घरापासून दूर प्रवास करत असतात. त्यामुळे ते आपल्या ट्रकला साथीदारासारखे जपतात. ट्रक सजवणे, देव-देवतांची चित्रे काढणे, खास संदेश लिहिणे ही त्यांची परंपरा बनली आहे.
त्यामुळे पुढच्या वेळी महामार्गावर एखाद्या ट्रकच्या मागे “Horn OK Please” दिसले, तर ते केवळ मजेशीर वाक्य नसून भारतीय वाहतूक इतिहासाचा एक जिवंत भाग आहे, हे लक्षात ठेवा.