पुढारी वृत्तसेवा
जगात अनेक सुंदर पक्षी आहेत. मात्र, काही पक्ष्यांचे सौंदर्य त्यांच्या अंगी असलेल्या धोकादायक गुणधर्मांमुळे चर्चेत असते. असाच एक पक्षी म्हणजे ‘हुडेड पिटोहुई’.
न्यू गिनीच्या घनदाट वर्षावनांमध्ये आढळणाऱ्या या पक्ष्याच्या पिसांमध्ये आणि त्वचेमध्ये अत्यंत शक्तिशाली विषारी घटक असतात.
या पक्ष्याला स्पर्श केल्यास त्वचेवर जळजळ होणे, मुंग्या येणे आणि शरीराचा संबंधित भाग बधिर होण्यासारखे त्रास होऊ शकतात. विशेष म्हणजे, या विषाचा संबंध जगातील अत्यंत विषारी बेडकांमध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांशी आहे.
हुडेड पिटोहुई हा साधारण २२ ते २३ सेंटीमीटर लांबीचा पक्षी आहे. त्याच्या शरीराचा रंग नारिंगी-तपकिरी असून डोके, गळा, छातीचा वरचा भाग, पंख आणि शेपटी काळ्या रंगाची असते.
१९९२ मध्ये पक्षितज्ज्ञ जॉन पी. डंबॅकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून पिटोहुई पक्ष्यांच्या तीन प्रजातींमध्ये 'होमोबॅट्राकोटॉक्सिन' हा विषारी घटक आढळल्याचे समोर आले.
या पक्ष्याच्या शरीरात आढळणारे बॅट्राकोटॉक्सिन हे अत्यंत प्रभावी न्यूरोटॉक्सिन आहेत. हे विष मज्जासंस्था आणि स्नायूंच्या पेशींमधील सोडियम वाहिन्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करते. त्यामुळे शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात.
हुडेड पिटोहुईच्या त्वचेत आणि पिसांमध्ये विषाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले. मात्र, केवळ या पक्ष्याला स्पर्श केल्याने माणसाचा मृत्यू होतो, असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
हुडेड पिटोहुई हा इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांमध्ये विभागलेल्या न्यू गिनी बेटाचा मूळ रहिवासी आहे. उष्णकटिबंधीय वर्षावने, डोंगराळ जंगले आणि उंचावरील वनक्षेत्रांमध्ये तो आढळतो.