पुढारी वृत्तसेवा
गुलाबाचं फूल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. सुंदर दिसणारं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सार्यांचं मन मोहून टाकणारं गुलाब बहुगुणी आहे.
जरी आपल्या परिचयाचा असला गुलाब, तरी या नेहमी दिसणार्या फुलाचे गुणधर्म, त्याचे दैनंदिन जीवनात होऊ शकणारे उपयोग हे आपल्यातल्या बहुतेकांना ठाऊक नसतात.
गुलाबापासून तयार केला जाणारा गुलकंद आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा आहे. गुलकंद जर औषध म्हणून वापरायचा असेल तर हल्ली बाजारात तयार गुलकंद बर्याच ठिकाणी उपलब्ध असतो. घरी देखील गुलकंद बनवता येऊ शकतो.
गुलकंद कसा बनवतात
घरच्या घरी गुलकंद बनवण्यासाठी सगळ्यात आधी फुलापासून गुलाब पाकळ्या सोडवून मोकळ्या करा.
पाकळ्यांच्या दुप्पट साखर घ्या आणि एकत्र करून स्वच्छ व सुक्या बरणीत भरा.
बरणी उन्हात ठेवा. एक-दोन महिन्यापर्यंत ती उन्हात तशीच राहू द्या आणि नंतर वापरायला काढा.
गुलकंद शक्यतो चैत्र महिन्यात बनवा.
असा घरच्या घरी बनवलेला गुलकंद शरीरासाठी विशेष उपयुक्त ठरू शकतो. मुख्य म्हणजे गुलकंदामुळे पोट साफ होण्यास मदत होते.