Garam Masala Recipe: हॉटेलसारखा सुगंधी आणि शुद्ध गरम मसाला घरी बनवण्याची सोपी पद्धत

पुढारी वृत्तसेवा

बाजारच्या भेसळयुक्त मसाल्यांमुळे जेवणाची चव बिघडतेय? मग आता काळजी सोडा! घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा सुगंधी आणि शुद्ध 'गरम मसाला'.

घरगुती मसाला फक्त शुद्धच नसतो, तर तो आपल्या आवडीनुसार कमी-जास्त तिखट किंवा सुगंधी करता येतो. जुन्या काळातील ही पद्धत जेवणाला अस्सल चव देते.

साहित्य :

  • धणे: अर्धा कप

  • काळी मिरी: २ मोठे चमचे

  • लवंग: २ मोठे चमचे

  • दालचिनी: ८-१० तुकडे

  • जिरे व शहाजिरे: प्रत्येकी २ चमचे

  • मोठी वेलची: ५, हिरवी वेलची: २०

  • चक्रफूल: २, तमालपत्र: ७-८

  • जायफळ: २, जावित्री: २ चमचे

  • बडीशेप: २ मोठे चमचे

  • सुंठ पावडर: २ चमचे

मसाले भाजून घ्या

गॅसवर पॅन गरम करा. त्यात धणे, जिरे, लवंग, मिरी, दालचिनी आणि वेलची मंद आचेवर हलकी भाजून घ्या. यामुळे मसाल्यातील ओलावा निघून जातो

त्याच पॅनमध्ये तमालपत्र आणि बडीशेप देखील वेगळी भाजून घ्या. मसाल्यांचा हलका सुगंध सुटू लागला की गॅस बंद करा आणि सर्व मसाले एका ताटात काढून गार करा.

मसाले पूर्ण थंड झाल्यावर त्यात सुंठ पावडर आणि कुटलेले जायफळ मिसळा. मिक्सरमध्ये मसाला वाटताना तो सतत न फिरवता, चालू-बंद करत वाटून घ्या.

मसाला जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या, यामुळे त्याचा नैसर्गिक सुगंध टिकून राहतो. तयार झालेला मसाला एका बरणीत भरून ठेवा.

हा ताजा गरम मसाला तुम्ही भाजी, आमटी, पनीर किंवा नॉन-व्हेज डिशेसमध्ये वापरून जेवणाची चव वाढवू शकता.