पुढारी वृत्तसेवा
घरामध्ये, विशेषतः स्वयंपाकघरात झुरळांचा वावर वाढला की आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो. केमिकलचे महागडे स्प्रे वापरण्याऐवजी तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या काही सोप्या गोष्टींनी तुम्ही त्यांचा कायमचा बंदोबस्त करू शकता. कसे? ते पुढे पाहा...
एका बाऊलमध्ये दोन चमचे बोरेक्स पावडर आणि एक चमचा साखर नीट एकत्र करा. हे मिश्रण घराच्या कोपऱ्यात आणि जिथून झुरळे येतात तिथे टाका. साखरेच्या सुगंधाने झुरळे बाहेर येतील आणि ही पावडर खाताच त्यांचा सफाया होईल.
जर तुमच्याकडे बोरेक्स पावडर नसेल, तर बेकिंग सोडा उत्तम पर्याय आहे. दोन चमचे बेकिंग सोड्यात एक चमचा साखर मिक्स करा. हे मिश्रण सिंकच्या खाली, बेडरुमच्या कोपऱ्यात आणि किचन कॅबिनेटजवळ टाका. झुरळांसाठी बेकिंग सोडा थेट विषासारखे काम करतो.
एका कप पाण्यात कडुनिंबाची पाने आणि लवंग पावडर टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. भिंतींच्या फटींमध्ये आणि कोपऱ्यात हा स्प्रे मारल्यास, या उग्र वासाने झुरळे त्वरित पळू लागतात.
किचनमध्ये झुरळांची फौज जमा होऊ नये म्हणून रात्रीचे जेवण झाल्यावर उरलेले अन्न नेहमी झाकून फ्रिजमध्ये ठेवा. तसेच, रात्री सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच ठेवणे टाळा. अस्वच्छतेमुळेच झुरळे जास्त आकर्षित होतात.
घराच्या किंवा किचनच्या भिंतींना बारीक तडे गेले असतील, तर झुरळे तिथेच आपली घरे बनवतात. ही छोटी छिद्रे आणि फटी सिलिकॉन किंवा स्प्रे फोमच्या मदतीने तातडीने बंद करा; जेणेकरून झुरळांना आत येण्याचा मार्गच बंद होईल.
घराची, विशेषतः किचनची नियमित आणि योग्य साफ़सफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. घरात हायजीन राखले नाही, तर कोपऱ्यांमध्ये झुरळांची अंडी आणि पैदास वेगाने वाढते. त्यामुळे कोपरे नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवा.
बाजारू कीटकनाशकांमध्ये धोकादायक रसायने असतात, जी लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे हे नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून तुमचे घर आणि किचन नेहमीसाठी झुरळमुक्त आणि सुरक्षित ठेवा.