रणजित गायकवाड
हाय ब्लडप्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब हा आजार आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तरुणांना वेगाने विळखा घालत आहे.
गेल्या काही वर्षांत २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढले आहे.
तज्ज्ञांच्या मते, अनेक तरुणांना आपण हायपरटेन्शनचे शिकार झालो आहोत, याची साधी कल्पनाही नसते. म्हणूनच याला 'सायलेन्ट किलर' म्हणतात.
कॉर्पोरेट लाइफ, करिअरची स्पर्धा आणि वैयक्तिक आयुष्यातील मानसिक ताण दीर्घकाळ राहणे हे रक्तदाब वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे.
अपुरी झोप आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याच्या सवयीमुळे शरीराचे चक्र बिघडते, ज्यामुळे थेट ब्लड प्रेशरवर परिणाम होतो.
मोबाईल, लॅपटॉप किंवा टी.व्ही.समोर तासन्तास घालवल्यामुळे शारीरिक हालचाली मंदावतात आणि मानसिक थकवा वाढतो.
आहारात जंक फूड, अतिप्रमाणात मीठ असलेले पाकीटबंद पदार्थ आणि प्रोसेस्ड फूडचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवर ताण येतो.
धूम्रपान आणि मद्यपानाचे वाढते प्रमाण उच्च रक्तदाबाला आमंत्रण देत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, चांगला आहार आणि डॉक्टरांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे.