Nivdung benefits: निवडुंगाचे आरोग्यासाठी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

निवडुंग हा प्रामुख्याने धारेचा वनस्पती प्रकार आहे. याला तीन, चार किंवा पाच धारा असतात.

निवडुंगाच्या चिकाचा मुख्य उपयोग शौचशुद्धी हा आहे. शौचाला साफ न झाल्यामुळे जे जे विकार होतात, ते सर्व निवडुंगाच्या चिकाने बरे होतात. बाजारात निवडुंगाचा सुका चीक सहजपणे उपलब्ध होतो.

जुनाट दमा आणि क्षयरोग: जेव्हा इतर कोणतेही औषध लागू पडत नाही, अशा वेळी निवडुंगाचा काढा दिल्यास चांगला उपयोग होतो.

लहान मुलांचा व वृद्धांचा खोकला: फण्या निवडुंगाची लाल बोंडे (फळे) विस्तवावर भाजून, त्याचे काटे जळल्यानंतर, त्याचा रस काढून पिण्यास देतात.

मूत्रमार्गाचे विकार: एक ग्रॅम चीक भाजलेल्या चण्याच्या पिठात कालवून त्याच्या गोळ्या कराव्यात आणि या विकारावर घ्याव्यात.

डांग्या खोकला आणि दमा: लोण्यामध्ये निवडुंगाच्या चिकाचे दोन थेंब टाकून ते चाटायला द्यावे. यामुळे कफ सुटून घसा मोकळा होतो.

कफ आणि ढास: लोणी, चिकाचे दोन थेंब आणि चिमटीभर मीठ एकत्र करून दिल्यास कफ लवकर सुटतो आणि खोकल्याची ढास कमी होण्यास मदत होते.

मूतखडा: अर्धा ग्रॅम किंवा तीन थेंब चीक दुधातून घेतल्यास लघवी व शौचास साफ होते. तसेच लघवीची आग, जळजळ आणि पोटदुखी थांबते.

कावीळ: सकाळी गुळात चिकाचे दोन थेंब मिसळून त्याची गोळी करावी आणि ती फक्त दोन दिवस घ्यावी. या कालावधीत पथ्य म्हणून केवळ दूध-भात खावा.

पोटफुगी आणि पोटदुखी: गुळात दोन थेंब चीक घालून त्याच्या गोळ्या कराव्यात आणि दिवसातून दोन वेळा घ्याव्यात. यामुळे पोट साफ होऊन हलके वाटते.

महत्त्वाची सूचना: निवडुंगाचा चीक अत्यंत तीव्र असतो. त्यामुळे वरील उपचारांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा अनुभवी वैद्यांचा सल्ला आवर्जून घ्यावा.