पुढारी वृत्तसेवा
मृत्यूनंतरचे जग कसे असते? स्वर्ग आणि नरक खरोखर आहेत का? हे प्रश्न आतापर्यंत केवळ धार्मिक ग्रंथांपुरते मर्यादित होते.
मात्र, हार्वर्ड विद्यापीठाचे माजी भौतिकशास्त्र प्राध्यापक डॉ. मायकल गिलेन यांनी चक्क विज्ञानाच्या आधारे स्वर्ग शोधल्याचा दावा केला आहे.
त्यांच्या या दाव्याने वैज्ञानिक आणि आध्यात्मिक जगात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. गिलेन यांचा हा दावा अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर आधारित आहे.
विज्ञानानुसार, जेव्हा एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाने (प्रतिसेकंद १,८६,००० मैल) प्रवास करते, तेव्हा तिथे वेळ थांबते.
डॉ. गिलेन यांच्या गणिती हिशेबानुसार, पृथ्वीपासून सुमारे २७३ अब्ज ट्रिलियन मैल अंतरावर विश्वाचे असे एक टोक आहे, जिथे आकाशगंगा प्रकाशाच्या वेगाने दूर जात आहेत.
यालाच कॉस्मिक होरायझन म्हणतात. या टोकावर पोहोचल्यावर भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ उरत नाही; उरते ती फक्त अनंतता.
बायबलमध्ये स्वर्गाचे वर्णन कालातीत जग असे केले आहे, जिथे वेळ अस्तित्वात नाही आणि जिथे मृतांचे आत्मे राहतात.
डॉ. गिलेन यांच्या मते, हे वैज्ञानिक ठिकाण आणि आध्यात्मिक स्वर्ग एकच आहे.