रणजित गायकवाड
भारतीय क्रिकेटचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धर्मशाला येथे सुरू असलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक नवा इतिहास रचला.
ट्रिस्टन स्टब्सला बाद करताच, हार्दिकने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 बळींचा टप्पा पूर्ण केला आणि त्याचबरोबर एक अनोखा 'डबल धमाका' करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जगभरातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या हार्दिकने केवळ 100 विकेट्सच पूर्ण केल्या नाहीत, तर तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा आणि 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
भारताच्या कोणत्याही खेळाडूला आजवर हा दुहेरी विक्रम साधता आला नव्हता. हार्दिक पंड्या आता जागतिक क्रिकेटमध्ये हा 'डबल धमाका' करणारा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी हा पराक्रम शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि सिकंदर रझा यांनी केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या तिघांच्या तुलनेत हार्दिक हा पहिला वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे, ज्याने हा टप्पा गाठला आहे!
इतकेच नव्हे, तर हार्दिक लवकरच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. त्याला या मैलाचा दगड गाठण्यासाठी फक्त 61 धावांची गरज आहे.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 100 विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या हा आता तिसरा गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी हा पराक्रम अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी केला आहे.
T20 विश्वचषक 2026 पूर्वी हार्दिकचे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये फॉर्ममध्ये असणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण 2024 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा त्याने दोन्ही आघाड्यांवर मॅच विनरची भूमिका बजावली होती.