Hammerkop : हिप्पोच्या पाठीवर बसून मासे पकडणारा पक्षी, घरटे एवढे दणकट की माणूस बसला तरी मोडणार नाही

Namdev Gharal

आफ्रिकेमध्ये एक रहस्यमय पक्षी आढळता, हॅमरकोप Hammerkop हा पक्षी त्‍याच्या विचित्र दिसण्याने निसर्गातील एक रहस्यमय जीव मानला जातो

या पक्षाच्या डोक्याचा आकार हातोड्यासारखा (Hammer) असल्यामुळे याला 'हॅमरकोप' असे म्हणतात. हे नाव आफ्रिकन भाषेतील शब्दावरून आले आहे.

हॅमरकोप अनेकदा हिप्पोपोटॅमसच्या पाठीवर बसलेला दिसतो. हिप्पो जेव्हा पाण्यातून चालतो, तेव्हा पाण्यातील मासे आणि कीटक सैरभैर होतात, ज्यामुळे हॅमरकोपला शिकार करणे सोपे जाते.

या पक्ष्याचा स्वभाव खूप धाडसी असतो, त्‍यामुळे तो रागीट हिप्पोलाही घाबरत नाही हिप्पो पाण्यात शिरताना त्‍याच्या पाठीवर बसून शिकार करु शकतो

पक्षी जगतात हॅमरकोपचे घरटे सर्वात मोठे मानले जाते. हे घरटे सुमारे १.५ मीटर ते २ मीटर पर्यंत उंच आणि तितकेच रुंद असू शकते.

मजबूत बांधकाम: हे घरटे काड्या, गवत आणि चिखलाचा वापर करून इतके मजबूत बनवलेले असते की, त्यावर एखादा माणूस सहज उभा राहू शकतो. एका घरट्याचे वजन २५ ते ५० किलो पर्यंत असू शकते.

एक घरटे पूर्ण करण्यासाठी हे जोडपे साधारणपणे ३ ते ६ महिने सतत मेहनत घेतात. एका घरट्यात साधारणपणे ८,००० ते १०,००० पेक्षा जास्त काड्या आणि इतर साहित्य असू शकते.

या अवाढव्य घरट्यात प्रवेश करण्यासाठी एकच अरुंद बोगदा असतो, जो आतल्या मुख्य खोलीकडे जातो. हे घरटे पिल्लांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत सुरक्षित असते.

अंधविश्वासामुळे आफ्रिकेतील लोक याच्या घरट्याला हात लावत नाहीत. असे मानले जाते की, ज्याने याचे घरटे नष्ट केले, त्याच्या घराला आग लागू शकते

अनेक आफ्रिकन संस्कृतींमध्ये हॅमरकोपला 'अपशकुनी' मानले जाते. जर हा पक्षी घरावरून उडून गेला किंवा ओरडला, तर काहीतरी वाईट घडणार असा तेथील लोकांचा समज आहे.

बिनधास्त स्वभाव: लोक आणि इतर प्राणी जवळ असूनही हा पक्षी सहसा घाबरत नाही. त्याच्या याच शांत आणि स्थिर स्वभावामुळे त्याच्याभोवती अनेक लोककथा विणल्या गेल्या आहेत.

हॅमरकोप दरवर्षी नवीन घरटे बांधतो. त्यामुळे त्याने सोडून दिलेल्या जुन्या आणि मोठ्या घरट्यांमध्ये घुबड, साप किंवा इतर लहान पक्षी आपला निवारा शोधतात.