Hair Trimming: केसांचे किती दिवसांनी ट्रिमिंग करावे? जाणून घ्या तुमच्या केसांनुसार परफेक्ट वेळ

पुढारी वृत्तसेवा

केस जलद वाढावेत म्हणून वारंवार कापणे आवश्यक असते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, केस कापल्याने त्यांची वाढ वेगाने होत नाही.

केस टाळूच्या खाली असलेल्या मुळांमधून वाढतात, त्यामुळे टोके कापल्याने वाढीत बदल होत नाही. केस कापणे ही एक देखभालीची प्रक्रिया आहे, जी केसांना निरोगी आणि मजबूत ठेवते.

केस एकदा टाळूतून बाहेर आले की ते मृत पेशींपासून बनलेले असतात, त्यामुळे खराब झालेले केस स्वतःहून दुरुस्त होऊ शकत नाहीत.

मात्र, केसांच्या टोकांना फुटलेले फाटे वेळीच कापले नाहीत, तर ते केसांच्या मुळांच्या दिशेने वाढत जातात, ज्यामुळे केस कमकुवत होऊन तुटण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच केस निरोगी ठेवण्यासाठी हा उपाय आहे.

केस किती दिवसांनी ट्रिम करावेत, यासाठी कोणताही एक नियम सर्वांना लागू होत नाही. साधारणपणे ६ ते १२ आठवड्यांतून एकदा केस ट्रिम करणे फायदेशीर ठरते.

लहान हेअरस्टाइल (बॉब, पिक्सी कट): ४ ते ६ आठवड्यांनी ट्रिमिंग आवश्यक

मध्यम ते लांब केस: ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर ठेवू शकता

जाड केस: अधिक मजबूत असल्याने कमी ट्रिमिंग चालते

पातळ केस: लवकर तुटतात, त्यामुळे वारंवार ट्रिमिंग गरजेचे

कुरळ्या किंवा तेलकट केसांमध्ये फाटे फुटल्याचे लगेच दिसून येत नाही, मात्र ते कोरडे पडल्यास ट्रिमिंग करणे गरजेचे ठरते.

केस केवळ कापल्याने ते लांब होत नाहीत, त्यामुळे नियमित ट्रिमिंगसोबतच टाळूचे आरोग्य, योग्य पोषण आणि हायड्रेशनकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.