Namdev Gharal
आर्युवेदामध्ये अशा अनेक बहुउपयोगी वनस्पतीं असतात की ज्या मानवी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत, अशी एक महत्वाची वनस्पती म्हणजे हाडमोडी याला हिंदीत हाडजोडी व संस्कृतमध्ये अस्थिसंहार म्हटले जाते
याचे इंग्रजी नाव Cissus quadrangularis असून ही एक बहुउपयोगी आणि अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक वेलवर्गीय वनस्पती आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती हाडे जोडण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी विशेष ओळखली जाते.
आधुनिक वैद्यकशास्त्र, क्ष-किरण (X-Ray) आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची तंत्रज्ञाने उपलब्ध होण्यापूर्वी भारतात पारंपारिक हाडवैद्य हाडमोडीचाच प्रमुख आधार घेऊन हाडे जुळवत असत.
याचे खोड चौकोनी, रसरशीत आणि सांध्यांसारखे विभागलेले असते. दिसायला ते मानवी शरीराच्या सांगाड्याप्रमाणे भासते. व मानवी हाडांसाठीही उपयुक्त ठरते, यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते.
ताज्या कांड्याचा रस किंवा पेस्ट हळद आणि तिळाच्या तेलात मिसळून दुखणाऱ्या सांध्यावर किंवा फ्रॅक्चर झालेल्या भागावर लेप केला जातो. यामुळे हाडे लवकर जूळून येतात
फ्रॅक्चर झाल्यास किंवा हाडांना इजा पोहोचल्यास हाडांचे टिश्यूज जलद जुळण्यासाठी आणि कॅल्शियमचे शोषण वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
सांधेदुखी आणि सूज : यामध्ये दाहकविरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात, ज्यामुळे संधिवात, गुडघेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.
वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ होण्याची समस्या असल्यास हाडमोडीचे सेवन हाडांची घनता (Bone Density) टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरते.
हाडांच्या आजाराव्यतिरीक्त ही भूक वाढवण्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी ही वनस्पती खूप उपयुक्त मानली जाते.
मुळव्याधीच्या त्रासात आणि जुन्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी याचा लेप किंवा अर्क वापरला जातो. बाजारात याचे चूर्ण, गोळ्या किंवा वटी आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात.
ताजी पाने किंवा कोवळ्या कांड्यांचे तुकडे तुपात भाजून त्यांची चटणी किंवा कढी बनवून खाल्ली जाते. कच्चा रस घशात खाज आणू शकतो, त्यामुळे तो नेहमी तूप किंवा तेलात परतूनच वापरतात.