Gujrat Mini Africa | गुजरातमध्ये एक असे गाव जे आहे भारतातील 'आफ्रिका'

Namdev Gharal

गुजरातमध्ये वसलेले आहे 'मिनी आफ्रिका'! या गावाचे नाव आहे जांबूर ते गिर सोमनाथ या जिल्हयात येते. या गावात आल्यावर तुम्हाला वाटेल तुम्ही आफ्रिकेतील कोणत्‍यातरी देशात आला आहात.

जांबूर गावातील लोक प्रामुख्याने 'सिद्दी' जमातीचे आहेत. हे लोक मुळात आफ्रिकेतील बंतू (Bantu) वंशाचे आहेत, जे अनेक शतकांपूर्वी भारतात आले. महाराष्ट्रातील जंजिरा किल्ला सिद्दींच्याच ताब्यात होता.

सिद्दी जमातीचे लोक ७ व्या शतकापासून भारतात येऊ लागले. अरब व्यापारी, पोर्तुगीज आणि ब्रिटीश त्यांना गुलाम, सैनिक किंवा सेवक म्हणून भारतात घेऊन आले होते.

जांबूर आणि परिसरातील बहुतेक सिद्दी कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. गुजरातच्या सुपीक जमिनीत ते प्रामुख्याने बाजरी, कापूस, भुईमूग आणि भाजीपाल्याची शेती करतात. अनेक जण दुग्धव्यवसाय आणि पशुपालनही (गाई, म्हशी) करतात.

हे गाव गिरच्या जंगलाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे वन विभागाच्या अंतर्गत येणारी कामे, जसे की जंगलाचे रक्षण, पर्यटन क्षेत्रात गाईड म्हणून काम सिद्दी तरुण काम करतात.

सिद्दी जमातीचे लोक आता पिढ्यानपिढ्या भारतात राहतात. ते पूर्णपणे 'भारतीय' आहेत, भारतीय नागरिकत्व त्यांच्याकडे आहे आणि ते गुजरातची स्थानिक भाषा (गुजराती) अस्खलितपणे बोलतात. त्‍यांना मतदानाचाही अधिकार आहे

इथे राहणाऱ्या सिद्दी लोकांच्या शारीरिक खुणा आफ्रिकन असल्या, तरी त्यांची जीवनशैली पूर्णपणे भारतीय आहे. ते भारतीय सण-उत्सव साजरे करतात आणि इथेच मिसळून गेले आहेत.

सिद्दी समाजात सहसा आपापल्या समाजातच लग्ने करण्याला पसंती दिली जाते. लग्नामध्ये ते भारतीय परंपरा आणि स्वतःची पारंपरिक 'धमाल' नृत्यशैली यांचा सुंदर मेळ घालतात.

हॉटेल किंवा रिसॉर्ट्समध्ये ते आपले पारंपरिक 'धमाल' नृत्य सादर करतात. यातून त्यांना उत्पन्नाचे एक चांगले साधन मिळते. पर्यटनाच्या दृष्टीने जेव्हा लोक जांबूरला भेट देतात, तेव्हा त्यांच्या या कलेचे त्यांना विशेष मानधन मिळते

जांबूरमधील सिद्दी आता शेती, बांधकाम आणि इतर व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत. ते आधुनिक जगाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत, पण त्यांनी आपली मूळ ओळख जपली आहे.

त्यांचा आहार पूर्णपणे भारतीय आहे. बाजरी, भात आणि कडधान्ये हे त्यांचे मुख्य अन्न असून, ते मांसाहारही करतात.

काळाच्या ओघात आता सिद्दी समाजातील तरुण शिक्षणाकडे वळले आहेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून किंवा स्थानिक पातळीवर इतर सरकारी खात्यांमध्ये हे लोक आता काम करत आहेत.