पुढारी वृत्तसेवा
आपल्यापैकी अनेकांना वाटतं हिरवं लिंबू कच्चं आणि पिवळं लिंबू पिकलेलं असतं. पण खरं सांगायचं तर ही दोन्ही लिंबं वेगवेगळ्या प्रकारची असतात.
पिवळ्या लिंबाला इंग्रजीत लेमन म्हणतात, तर हिरव्या लिंबाला लाईम असं म्हणतात. दोन्ही आंबट फळं असली तरी त्यांची जात आणि गुणधर्म वेगळे आहेत.
हिरवं लिंबू म्हणजे लाइमचं वैज्ञानिक नाव सिट्रस ऑरेंटिफोलिया आहे. तर पिवळ्या लिंबाचं म्हणजे लेमनचं नाव सिट्रस लिमोन आहे. दोन्ही सिट्रस फॅमिलीतील असले तरी प्रकार वेगळे आहेत.
हिरवं लिंबू म्हणजे लाइम उष्ण आणि दमट हवामानात चांगलं वाढतं. तर पिवळं लिंबू मध्यम हवामानातही सहज वाढू शकतं.
पिवळं लिंबू सहसा आकाराने मोठं आणि थोडंसं अंडाकृती असतं. हिरवं लिंबू लहान आणि गोलसर दिसतं.
पिवळ्या लिंबाची साल तुलनेने जाड आणि थोडी गुळगुळीत असते. हिरव्या लिंबाची साल पातळ आणि कधीकधी खडबडीत वाटू शकते.
पिवळ्या लिंबात आंबटपणासोबत थोडीशी गोडसर चव असते. तर हिरव्या लिंबाची चव जास्त आंबट असते.
लेमन म्हणजे पिवळ्या लिंबाचा सुगंध सौम्य आणि फ्रेश वाटतो. लाइम म्हणजे हिरव्या लिंबाचा वास जास्त तीव्र आणि स्ट्रॉंग असतो.
हिरवं लिंबू चटण्या, मसालेदार पदार्थ, मॉकटेल आणि मेक्सिकन फूडमध्ये जास्त वापरलं जातं. तर पिवळं लिंबू सरबत, सलाड ड्रेसिंग आणि बेकिंगमध्ये जास्त वापरतात.
दोन्ही लिंबं फायदेशीर आहेत. पण कोणतं वापरायचं हे तुमच्या पदार्थावर आणि चवीवर अवलंबून आहे.