Ganesh Idol : धगधगत्या ज्वालामुख्यावर ७०० वर्षांपासून विराजमान बाप्पा

पुढारी वृत्तसेवा

जगातले एकमेव गणेश मंदिर

एकीकडे लाव्हा आणि धूर ओकणारा सक्रिय ज्वालामुखी, तर दुसरीकडे शांतपणे विराजमान झालेले विघ्नहर्ता! कोणत्याही सक्रिय ज्वालामुख्याच्या शिखरावर वसलेली ही जगातील एकमेव गणेशमूर्ती आहे.

इंडोनेशियातील पूर्व जावा भागात असलेल्या प्रसिद्ध आणि धोकादायक ‘माऊंट ब्रोमो’ (Mount Bromo) या सक्रिय ज्वालामुख्याच्या तोंडावर बाप्पाची ही अलौकिक मूर्ती स्थापन आहे.

माऊंट ब्रोमो परिसरात एकूण ७ ज्वालामुखी आहेत, त्यापैकी हा एकच सक्रिय आहे. स्थानिक नागरिक बाप्पाला केवळ देव न मानता संपूर्ण परिसराचे 'अधिपती आणि रक्षक' मानतात.

इतिहासकारांच्या मते, ही गणेशमूर्ती सुमारे ७०० वर्षे जुनी आहे. स्थानिक ‘तेंगगेर’ (Tengger) आदिवासी समाजाने या मूर्तीची स्थापना शिखरावर केली होती.

माऊंट ब्रोमोच्या लगतच्या सुमारे ४८ गावांमध्ये आजही हिंदू बांधव राहतात. हे नागरिक १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘माजापाहित’ साम्राज्याचे वंशज मानले जातात.

जोपर्यंत गणेशमूर्ती या शिखरावर आहे, तोपर्यंत ज्वालामुखीतून निघणारा लाव्हा गावे आणि पिकांचे नुकसान करू शकत नाही, अशी इथल्या भाविकांची पिढ्यानपिढ्या दृढ श्रद्धा आहे.

'ब्रोमो' या शब्दाची उत्पत्ती 'ब्रह्मा' या नावावरून झाली आहे. पर्वताच्या पायथ्याशी ९व्या शतकातील काळ्या दगडांचे एक प्राचीन ब्रह्मा मंदिरही दिमाखात उभे आहे.

कठीण चढण पार करून येणारे भाविक आणि विदेशी पर्यटक बाप्पाला फळे, फुले आणि जिवंत प्राणीही नवस म्हणून अर्पण करतात; तसेच शास्त्रोक्त पद्धतीने धूप-दीप लावून पूजा करतात.

धोक्यांनी वेढलेल्या या शिखरावरून बाप्पा जणू भक्तांना संदेश देतात; "भिण्याचे कारण नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे."