पुढारी वृत्तसेवा
अनेकांना जेवल्यानंतर पोट जड होणे, गॅस आणि ढेकरांचा त्रास होतो. बहुतांश वेळा यामागे आरोग्याची मोठी समस्या नसून आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असतात.
आयुर्वेदानुसार वारंवार ढेकर येणे आणि ब्लोटिंग (पोट फुगणे) हे मंदावलेल्या ‘पाचक अग्नी’चे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही काय, कधी आणि कसे खाता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अन्न नेहमी ताजे आणि किंचित कोमट असतानाच खावे. शिळे, खूप थंड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ पचनावर ताण आणतात आणि गॅस निर्माण करतात.
पोट पूर्ण भरेपर्यंत कधीही जेवू नका. आयुर्वेदानुसार अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी पोटाचा काही भाग नेहमी रिकामा ठेवणे गरजेचे आहे.
घाईघाईत खाल्ल्याने अन्नासोबत हवा पोटात जाते, ज्यामुळे ढेकरांचा त्रास वाढतो. त्यामुळे अन्न सावकाश आणि व्यवस्थित चावून खाणे फायदेशीर ठरते.
आयुर्वेदात विसंगत पदार्थांचे एकत्र सेवन (विरुद्ध आहार) टाळण्याचा सल्ला दिला जातो. एकत्र न चालणारे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि गॅसची समस्या होते.
आधीचे जेवण पूर्णपणे पचल्याची जाणीव झाल्यावरच पुढील आहार घ्या. तसेच रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर उरका, जेणेकरून झोपेपूर्वी पचन सुलभ होईल.
जेवताना सतत बोलणे, मोबाईल पाहणे किंवा टीव्ही बघणे टाळा. एकाग्रतेने आणि शांत चित्ताने अन्न ग्रहण केल्यास पाचक रस योग्य प्रमाणात स्रवतात.
जेवणानंतर पोट फुगल्यासारखे किंवा जड वाटल्यास ओवा किंवा आल्याचे तुकडे खावेत. हे मसाले गॅस कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात.
सतत ढेकर आणि ब्लोटिंगसह पोटात तीव्र वेदना, उलट्या किंवा वजन अचानक कमी होणे यांसारखी लक्षणे दिसत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.