पुढारी वृत्तसेवा
तुम्ही पंख असलेले प्राणी उडताना पाहिले असतील, पण तुम्ही कधी उडणारा साप पाहिला आहे का?
घनदाट जंगलात उंच फांदीवर बसलेला साप अचानक उडी मारतो आणि पंखांशिवाय हवेत तरंगू लागतो. पण हे कसं शक्य आहे?
आशियाई जंगलात आढळणाऱ्या या उडणाऱ्या सापांच्या अद्वितीय क्षमतेबद्दल नवीन खुलासे समोर आले आहेत, ज्यामध्ये पंख नसताना ते हवेत कसे संतुलन साधतात आणि कसे उडतात हे स्पष्ट केले आहे.
उडणारे साप क्रायसोप्लेया वंशाचे असतात आणि सामान्यतः ७० ते १३० सेंटीमीटर लांबीचे असतात.
त्यांचे शरीर सामान्य सापांपेक्षा थोडेसे सपाट असते. जेव्हा ते झाडावरून उडी मारतात तेव्हा ते त्यांच्या फासळ्या पसरवून त्यांचे शरीर रुंद करतात.
यामुळे त्यांच्या शरीराच्या वर आणि खाली वेगवेगळे वायुप्रवाह निर्माण होतात, ज्यामुळे त्यांच्या पडण्याचा वेग कमी होतो.
हे साप भारत, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि आसपासच्या देशांच्या घनदाट जंगलात आढळतात.
हे साप झाडांवर राहतात आणि क्वचितच जमिनीवर उतरतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी उडणे हा त्यांच्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे, कारण यामुळे जमिनीवर असणाऱ्या शिकारी प्राण्यांपासून त्यांचा बचाव होतो.
हे साप सरडे, बेडूक आणि कधीकधी छोट्या पक्ष्यांची शिकार करतात. मात्र, हे उडताना शिकार करत नाहीत, तर केवळ नवीन ठिकाणी पोहोचण्यासाठी उडण्याच्या कलेचा वापर करतात.
शास्त्रज्ञांच्या मते, यांची ही उडी म्हणजे पूर्णपणे उडणे नसून, अत्यंत संतुलित पद्धतीने खाली पडणे असते, ज्यामध्ये उंची ठरवते की साप किती दूरपर्यंत जाऊ शकेल.