Floating Farming : ही आहे पाण्यावर तरंगणारी शेती! मातीचा वापर न करता पिकवला जातो भाजीपाला!

Namdev Gharal

बांगलादेशात एक अनोखी शेती केली जाते ती म्हणजे तरंगणारी शेती Floating Farming , यामध्ये केवळ कचरा वनस्पती यांचा वापर करुन भाजीपाला पिकवला जातो

यामध्ये पुराच्या पाण्यावर तरंगणारे सेंद्रिय बेड तयार करून शेती केली जाते. स्थानिक भाषेत या तरंगत्या शेतीला 'धाप' (Dhap) किंवा 'बायरा' असे म्हणतात

ही कोणतीही आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली नसून, बांगलादेशच्या नैऋत्येकडील भागातील शेतकऱ्यांनी पूर आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी २०० वर्षांपूर्वी शोधून काढलेली एक पारंपारिक कला आहे

या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मातीचा अजिबात वापर केला जात नाही. संपूर्ण शेती केवळ पाणी आणि वनस्पतींच्या कचऱ्यावर केली जाते

हे तरंगते बेड प्रामुख्याने जलपर्णी , बांबू, पेंढा आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर करून थरावर थर तयार केले जातात. हे बेड पाण्यात सहज तरंगतात.

जलपर्णी वनस्पती सडल्यानंतर त्यातून पोषक घटक बाहेर पडतात, जे पिकांसाठी उत्तम नैसर्गिक खत म्हणून काम करतात. त्यामुळे इथे रासायनिक खतांची गरज भासत नाही.

बांगलादेशात पावसाळ्यात अनेक महिने जमीन पाण्याखाली जाते. अशा वेळी सामान्य शेती अशक्य होते, पण हे तरंगते बेड पाण्याच्या पातळीसोबत वर-खाली होतात, ज्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही.

या तरंगत्या बेडवर प्रामुख्याने भेंडी, दुधी भोपळा, कारली, टोमॅटो, काकडी यांसारख्या भाज्या आणि विविध प्रकारच्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

शेतकरी या तरंगत्या शेतांची देखभाल करण्यासाठी, बियाणे रोवण्यासाठी आणि भाज्यांची काढणी करण्यासाठी लहान बोटींचा वापर करतात.

संयुक्त राष्ट्रांच्या 'FAO' (अन्न आणि कृषी संघटना) ने बांगलादेशच्या या फ्लोटिंग फार्मिंग पद्धतीला 'Globally Important Agricultural Heritage System' (GIAHS) म्हणजेच 'जागतिक स्तरावर महत्त्वाचा कृषी वारसा' म्हणून घोषित केले आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत असल्याने. अशा परिस्थितीत बांगलादेशची ही 'फ्लोटिंग फार्मिंग' संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आणि भविष्यातील शेतीचे मॉडेल ठरत आहे.