Namdev Gharal
फ्लेम बोवरबर्ड (Flame Bowerbird) हा न्यू गिनीच्या जंगलात आढळणारा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि देखणा पक्षी आहे. त्याच्या घरटे बांधण्याच्या अद्भूत कलेमुळे तो जगभर प्रसिद्ध आहे.
नर फ्लेम बोवरबर्ड जे 'बोवर' तयार करतो, त्याचा आकार आणि रचना अनेकदा 'गेम ऑफ थ्रोन' (Game of Thrones) मधील प्रसिद्ध 'लोखंडी सिंहासना'सारखी (Iron Throne) दिसते.
हा पक्षी जमिनीवर वाळलेल्या काड्या आणि डहाळ्या उभ्या करून दोन समांतर भिंती किंवा कमान तयार करतो. या काड्या अशा पद्धतीने रचलेल्या असतात की ती एक भव्य, टोकदार आणि आकर्षक आसनाची किंवा सिंहासनाची प्रतिकृती वाटते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नर पक्षी जी काड्यांची आलिशान रचना करतो, त्याला वैज्ञानिक भाषेत 'बोवर' (Bower) म्हणतात. हे अंडी घालण्यासाठीचे घरटे नसते, तर फक्त मादीला आकर्षित करण्यासाठी बनवलेले असते.
हा पक्षी कलाकारासारखा काम करतो. तो आपल्या 'सिंहासना'च्या समोरचा भाग अतिशय स्वच्छ ठेवतो. तिथे तो जंगलातून शोधून आणलेली गडद रंगाची फळे, बेरीज, रंगीबेरंगी फुले, गोगलगायींची टरफले आणि चमकदार वस्तू अगदी रांगेत सजवून ठेवतो.
या पक्षांमध्ये स्पर्धा खूप जास्त असते. इतर तरुण किंवा प्रतिस्पर्धी नर अनेकदा दुसऱ्या नराचे सुंदर बनवलेले 'सिंहासन' चोरून तोडून टाकतात किंवा त्यातील सजावटीचे सामान चोरून नेतात.
नर फ्लेम बोवरबर्ड रंग अगदी धगधगत्या आगीसारखा गडद लाल, नारंगी आणि पिवळा असतो, तर त्याचे पंख आणि शेपटी काळ्या रंगाची असते. याउलट, मादी पक्षी दिसायला फिकट तपकिरी-ऑलिव्ह रंगाची असते.
जेव्हा एखादी मादी त्याचे 'सिंहासन' पाहण्यासाठी तिथे येऊन बसते, तेव्हा नर पक्षी तिच्यासमोर एक खास डान्स सादर करतो.
डान्स करताना तो आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या कॅमेऱ्याच्या लेन्ससारख्या लहान-मोठ्या करतो, ज्यामुळे मादी एका जागी थिजून त्याचा डान्स पाहते.
हे पक्षी जंगलात साधारणपणे २० ते ३० वर्षे जगू शकतात. नर पक्षाला एवढी गुंतागुंतीची कलाकुसर आणि डान्स शिकण्यासाठीच सुरुवातीची ५ ते ७ वर्षे सराव करावा लागतो.