पुढारी वृत्तसेवा
फिनलंडच्या किनारपट्टीवर वसलेले सुपरशी आयलंड सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
बाल्टिक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या 8.4 एकरच्या या खासगी बेटावर केवळ महिलांचे राज्य आहे. त्यांना पुरुषी हस्तक्षेप किंवा सामाजिक दबावाशिवाय स्वतः सोबत वेळ घालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते.
येथे दाट जंगले, विलोभनीय खडकाळ किनारे, आलिशान लाकडी व्हिला आहेत. गोपनीयता राखण्यासाठी येथे एका वेळी फक्त 8 महिलांनाच राहण्याची परवानगी दिली जाते.
येथे येणाऱ्या महिला योग, ध्यानधारणा, सकस आहार आणि समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारून आनंद घेतात. या अनोख्या बेटाची संकल्पना अमेरिकन टेक कंपनीच्या माजी सीईओ क्रिस्टीन रोथ यांची होती.
त्यांनी 2018 मध्ये हे बेट खरेदी केले होते. महिलांनी मोकळेपणाने हसावे, मेकअपशिवाय राहावे आणि स्वतःच्या क्षमता ओळखाव्यात, यासाठी त्यांना अशी जागा हवी होती.
पुरुषांच्या उपस्थितीमुळे अनेकदा महिला आपल्या सौंदर्याबद्दल किंवा वागण्याबद्दल जास्त सजग होतात. त्यामुळे त्या मोकळेपणाने जगू शकत नाहीत.
2023 मध्ये हे बेट एका कंपनीने10 कोटी रुपयांहून अधिक किमतीत विकत घेतले. मात्र, मालक बदलला असला तरी या बेटाच्या मूळ संकल्पनेत कोणताही बदल झालेला नाही.
प्लम्बर किंवा देखभालीच्या कामासाठीच केवळ पुरुष कर्मचाऱ्यांना येथे येण्याची परवानगी दिली जाते.