Amazing Animals: 'हा' प्राणी पायांनी ऐकतो; माणसापेक्षाही तल्लख असते स्मरणशक्ती

पुढारी वृत्तसेवा

हत्ती हे जगातील सर्वात बुद्धिमान, संवेदनशील आणि शक्तिशाली प्राण्यांपैकी एक मानले जातात.

त्यांची स्मरणशक्ती, सामाजिक जडणघडण आणि शारीरिक क्षमता त्यांना इतर प्राण्यांपासून वेगळे ठरवते. हत्ती केवळ आपल्या पर्यावरणाला समजत नाहीत, तर त्यात बदल करण्याची क्षमताही त्यांच्यात असते.

त्यांची सोंड, अवाढव्य कान, मजबूत शरीर आणि खोल भावनिक समज त्यांना निसर्गाचा एक अनोखा चमत्कार बनवते. हत्ती नेमके किती खास आहेत, हे सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी

पायांनी ऐकण्याची अद्भूत क्षमता

हत्तींच्या पायांमध्ये आणि सोंडेमध्ये अत्यंत संवेदनशील नसा असतात. याच्या मदतीने ते जमिनीत होणारी कंपने सहज जाणू शकतात. अनेक किलोमीटर दूरवरून येणारे कमी वारंवारतेचे आवाज आणि कंपने ते पायांच्या माध्यमातून ओळखतात.

सोंडेत असतात ४०,००० हून अधिक स्नायू

हत्तीच्या सोंडेत एकही हाड नसते, पण त्यात तब्बल ४०,००० पेक्षा जास्त स्नायू असतात. मानवी शरीरात साधारण ६०० स्नायू असतात, यावरून हत्तीच्या सोंडेच्या शक्तीचा अंदाज लावता येतो.

हत्तींचे मोठे कान त्यांच्या शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. कानांमधील रक्तप्रवाह वाढवून ते शरीरातील उष्णता बाहेर टाकतात, ज्यामुळे रणरणत्या उन्हातही त्यांचे शरीर थंड राहण्यास मदत होते.

पिढ्यानपिढ्या लक्षात राहतात पाण्याचे स्रोत

हत्तींच्या कळपाचे नेतृत्व सहसा एक अनुभवी मादी करते. तिला अनेक दशकांपूर्वीचे पाण्याचे स्रोत आणि स्थलांतराचे मार्ग अचूक लक्षात असतात.

आरशात स्वतःला ओळखण्याची बुद्धिमत्ता

आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःला ओळखू शकणाऱ्या मोजक्या प्राण्यांमध्ये हत्तींचा समावेश होतो. हे त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचे लक्षण आहे.

कातडी जाड पण कमालीची संवेदनशील

हत्तीची त्वचा एक इंचापेक्षा जास्त जाड असू शकते, तरीही ती अत्यंत संवेदनशील असते. त्वचेवर बसलेली साधी माशीदेखील त्यांना जाणवते.