पुढारी वृत्तसेवा
अंडी ही आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ, पण बऱ्याचवेळा अंडी विकत घेतल्यानंतर ती किती दिवस ठेवता येतात व साठवताना काय काळजी घ्यावी हे पाहूया
कच्ची अंडी ही फ्रिजमध्ये योग्य तापमानात (४°C किंवा त्यापेक्षा कमी) ठेवल्यास ही अंडी साधारण ३ ते ५ आठवडे (सुमारे १ महिना) सुरक्षित आणि खाण्यायोग्य राहतात.
फ्रिजशिवाय अंडी ठेवल्यास हिवाळ्यात, १० ते १५ दिवस चांगली राहतात. तर उन्हाळ्यात / उष्ण वातावरणात: ५ ते ७ दिवसांच्या आतच ती खाऊन संपवावीत. उष्णतेमुळे अंड्यातील आर्द्रता लवकर कमी होते आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.
समजा अंडी उकडली व जर साठवून ठेवली तर जास्तीत जास्त ५ ते ७ दिवसच चांगली राहतात.कारण त्यांच्या कवचाचा नैसर्गिक संरक्षक थर निघून जातो.
फ्रिजच्या दरवाजाच्या ट्रेमध्ये अंडी ठेवू नका - दरवाजा वारंवार उघड-झाप केल्याने तिथले तापमान बदलत राहते. अंडी नेहमी फ्रिजच्या आतल्या मुख्य रॅकवर, जिथे तापमान स्थिर असते, तिथेच ठेवावीत.
अंडी धुवून ठेवण्याची चूक करू नका- अंडी फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी धुऊ नयेत. धुण्यामुळे अंड्यावरील सूक्ष्म छिद्रांचे नैसर्गिक आवरण नष्ट होते आणि बॅक्टेरिया आत शिरण्याचा धोका वाढतो. अंडी वापरतानाच धुवावीत.
अंडी साठवण्याची योग्य पद्धत : अंडी नेहमी त्यांच्या मूळ अंड्यांच्या ट्रेमध्ये (Carton) किंवा झाकण असलेल्या डब्यात ठेवावीत, जेणेकरून फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास अंड्यांमध्ये उतरत नाही.
अंडे खराब झाले की नाही कसे ओळखावे? : एका भांड्यात पाणी घेऊन अंडे त्यात टाका. जर अंडे पाण्यावर तरंगत असेल, तर ते खराब झाले आहे असे समजावे आणि ते अजिबात खाऊ नये. अंडे बुडले तर ते चांगले, फ्रेश आहे हे लक्षात ठेवा
अंड्याला तडे गेलेले असल्यास, त्याला दुर्गंधी येत असल्यास किंवा रंग बदलला असल्यास ते खाणे टाळा. अशी अंडी खाल्यास पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका असतो