Drongo Bird : निसर्गातील महाठग पक्षी! शिकारी प्राण्यांचे आवाज काढून इतरांचे अन्न पळवतो

Namdev Gharal

आफ्रिका खंडात आढळणारा फोर्क-टेल्ड ड्रोंगो (Fork-tailed Drongo) हा पक्षी त्याच्या कमालीच्या हुशारीसाठी आणि आवाजाची नक्कल करून अन्न चोरण्याच्या सवयीसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

हा पक्षी इतर ५० पेक्षा जास्त पक्षी आणि प्राण्यांच्या धोक्याच्या इशाऱ्यांचे (Alarm Calls) हुबेहूब आवाज काढण्यात पटाईत असतो. यात तो घार, ससाणा यांसारख्या शिकारी पक्षांच्या आवाजाची अचूक नक्कल करतो.

जेव्हा मीअरकॅट (Meerkat) किंवा इतर पक्षी जमिनीत खोदून किडे वा विंचू पकडतात, तेव्हा ड्रोंगो शिकारी आल्याचा खोटा ओरडा करतो. हा आवाज ऐकून घाबरलेले प्राणी अन्न तिथेच टाकून बिळात पळून जातात आणि ड्रोंगो ते अन्न फस्त करतो.

प्राण्यांना संशय येऊ नये म्हणून हा पक्षी सुरुवातीला खरोखरच शिकारी आल्यावर खरा धोक्याचा इशारा देऊन त्यांचा विश्वास जिंकतो. एकदा प्राण्यांचा विश्वास बसला की मग तो वारंवार खोटे इशारे देऊन त्यांना फसवू लागतो.

जर एखाद्या प्राण्याला ड्रोंगोच्या आवाजाचा संशय आला आणि तो पळाला नाही, तर ड्रोंगो लगेच दुसऱ्या एखाद्या पक्षाचा धोक्याचा आवाज काढून त्यांना चकवतो. आवाजातील या बदलामुळे प्राणी गोंधळात पडतात आणि पळ काढतात.

हिवाळ्यात जेव्हा कीटकांची कमतरता असते, तेव्हा ड्रोंगोच्या एकूण आहारापैकी सुमारे २० ते २५ टक्के अन्न हे केवळ अशा चोरीतूनच मिळवलेले असते.

निसर्गात या इतरांचे अन्न पळवण्याच्या अशा प्राणी किंवा पक्ष्यांच्या प्रवृत्तीला 'क्लेप्टोपॅरासायटिझम' (Kleptoparasitism) म्हणतात.

हा पक्षी संपूर्ण काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा आणि दुभंगलेली (कात्रीसारखी) शेपटी असलेला चपळ पक्षी आहे. त्याची ही वैशिष्ट्यपूर्ण शेपटी त्याला हवेत अचानक वळणे घेऊन अचूक झेप घेण्यास मदत करते.