Namdev Gharal
सर्वसाधारणपणे निसर्गात कोणत्याही झाडाची फांदी तोडली किंवा तिच्यावर घाव घातला तर त्यामुळे चिक, पाणी, किंवा रस बाहेर येतो, पण असे एक झाड आहे याच्यातून ‘रक्त’ बाहेर येते.
हे झाडपण अनोखे असून याचे नावही वेगळे आहे. याला ड्रॅगन ट्री म्हणतात, हे जगात एकाच ठिकाणी आढळते ते म्हणजे येमेन देशाच्या साकोट्रा बेटावर
या झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातून लाल भडक रंगाचा डिंक किंवा रस बाहेर पडतो. हा रस हुबेहूब रक्तासारखाच असतो. यामुळेच याला 'ड्रॅगनचे रक्त' देणारे झाड असे नाव पडले आहे.
हे झाड नेहमीच्या झाडांसारखे पसरलेले नसते. याची रचना एखाद्या विशाल 'उलट्या छत्रीसारखी' किंवा मशरूम सारखी दिसते.
याच्या दाट फांद्या छतासारख्या एकत्र येतात आणि पाने फक्त फांद्यांच्या टोकावर वरच्या बाजूला वाढतात. दुरून पाहिल्यावर हे झाड एखाद्या दुसऱ्या ग्रहावरील वनस्पतीसारखे वाटते
झाडातून निघणाऱ्या या लाल रसाचा वापर प्राचीन काळापासून विविध गोष्टींसाठी केला जातो, स्थानिक लोक याचा वापर पोटाचे आजार, जखमा भरणे आणि ताप कमी करण्यासाठी पारंपरिक औषध म्हणून करतात
या रसापासून गडद लाल रंग तयार केला जातो. प्राचीन काळी रोम आणि ग्रीसमध्ये याचा वापर कापड रंगवण्यासाठी, मटक्यांवर नक्षीकाम करण्यासाठी आणि पेंटिंगसाठी केला जायचा
सोकोट्रा बेटावर पाऊस खूप कमी पडतो आणि कडक ऊन असते. या झाडाचा छत्रीसारखा आकार त्याला तीव्र उन्हापासून वाचवतो. झाडाच्या दाट सावलीमुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही
या झाडाबाबात काही समजूती असून, प्राचीन काळी या बेटावर एका महाकाय हत्ती आणि ड्रॅगन (Dragon) यांच्यात भयंकर युद्ध झाले होते. त्या युद्धात ड्रॅगनचे जे रक्त जमिनीवर सांडले, त्यातूनच ही 'ड्रॅगन ब्लड ट्री' उगवली.
हवामान बदल आणि येथील पाळीव शेळ्या झाडांची लहान रोपे खाऊन टाकतात. त्यामुळे ही दुर्मिळ प्रजाती आता धोक्यात आली आहे. म्हणूनच युनेस्कोने (UNESCO) या बेटाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.