Namdev Gharal
तुम्ही कधीतरी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत काहीतरी आणायला जाता आणि तिथे पोहोचताच "मी इथे काय करायला आलो होतो?" असा विचार करत डोक्याला हात लावता?
ही गोष्ट अनेकांच्या बाबतीत होत असेल, याला आपण विसरभोळेपणा समजतो पण मानसशास्त्रात याला ‘डोअरवे इफेक्ट’ (Doorway Effect) किंवा ‘लोकेशन अपडेटिंग इफेक्ट’ (Location Updating Effect) म्हणतात. हे काय ते समजून घेऊ
जेव्हा आपण एका भौतिक जागेतून (उदा. बेडरूम) दुसऱ्या जागेत (उदा. किचन) दरवाजा ओलांडून जातो, तेव्हा आपले मेंदू जुन्या आठवणी किंवा चालू विचार तात्पुरते 'डिलीट' किंवा 'फ्लश' करतो.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, दरवाजा (Doorway) हा मेंदूसाठी एका 'इव्हेंट बाउंड्री' (Event Boundary) सारखा काम करतो. म्हणजेच, मेंदूला वाटते की एक काम संपले आहे आणि आता नवीन जागेत नवीन काम सुरू करायचे आहे.
अनेकदा लोकांना वाटते की खोलीत जाताच वस्तू विसरणे म्हणजे आपल्याला 'विसरभोळेपणा' किंवा 'अल्झायमर्स' सारखा आजार झाला आहे. पण तसे अजिबात नाही! याचा आणि तुमच्या कमकुवत स्मरणशक्तीचा काहीही संबंध नाही.
आपला मेंदू एका वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जेव्हा आपण दरवाजा ओलांडतो, तेव्हा मेंदू जुनी माहिती मागे सोडून नवीन वातावरणाची माहिती गोळा करू लागतो. हा विसरभोळेपणा नसून मेंदूची कार्यपद्धती आहे.
संशोधनानुसार, हा इफेक्ट अगदी सामान्य आहे आणि तो हुशार व्यक्तींच्या बाबतीतही तितकाच घडतो. त्यामुळे याला नेहमीचा विसरभोळेपणा समजण्याची चूक करू नका.
हे टाळण्यासाठी एक ट्रिक आहे तो म्हणजे मनातल्या मनात बोलत राहा: बेडरूममधून किचनमध्ये जाताना "मला पाणी प्यायचे आहे, मला पाणी प्यायचे आहे..." असे मनात किंवा हळू आवाजात बोलत जा.
थोडक्यात सांगायचे तर: खोली बदलताच विसरणे हा मानसिक आजार किंवा विसरभोळेपणा नाही, तर तुमच्या मेंदूने घेतलेला एक छोटासा 'शॉर्ट ब्रेक' आहे!