Drinking Water Cancer Risk: स्वच्छ, शुद्ध केलेले पाणी पिल्याने कर्करोगाचा धोका वाढतो का?

पुढारी वृत्तसेवा

जर पाणी स्वच्छ दिसत असेल, त्याची चव सामान्य असेल आणि त्याला कोणताही वास नसेल, तर आपण ते सुरक्षित आहे असे मानतो. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केवळ या गोष्टींवरून पाणी हानिकारक घटकांपासून मुक्त आहे, असे म्हणता येणार नाही.

अगदी पूर्णपणे स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यातही अनेक घातक रसायने असू शकतात. डॉक्टरांच्या मते पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही रसायने तयार होऊ शकतात, जी आपल्या पिण्याच्या पाण्यात मिसळू शकतात.

या घटकांच्या दीर्घकालीन संपर्कात राहिल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

पाण्यामुळे कर्करोग होऊ शकतो का?

डॉक्टरांचे थेट उत्तर आहे - हो. मात्र, हा धोका किती असेल, हे तुम्ही किती पाणी पिता आणि किती काळ अशा पाण्याच्या संपर्कात राहता, यावर अवलंबून असते.

काही रसायने 'कार्सिनोजेनिक' (कर्करोग निर्माण करणारी) किंवा संभाव्य कर्करोगकारक मानली जातात. याचा अर्थ असा नाही की, एकदा असे पाणी प्यायल्याने लगेच कर्करोग होईल.

कर्करोग हा सहसा दीर्घकाळात विकसित होणारा आजार आहे; त्यामुळे, एखाद्या व्यक्तीने किती दूषित पाणी प्यायले आहे आणि किती वर्षांपासून त्याचे सेवन करत आहे, यावर धोक्याची तीव्रता अवलंबून असते.

डॉक्टरांच्या मते, भारतसह अनेक देशांतील भूजलामध्ये आर्सेनिक नैसर्गिकरित्या आढळते. आर्सेनिकच्या दीर्घकालीन संपर्कामुळे त्वचा, फुफ्फुसे आणि मूत्रमार्गाशी संबंधित कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

त्याचप्रमाणे, क्लोरीन वापरून पाणी निर्जंतुक करण्याच्या प्रक्रियेतून 'ट्रायहॅलोमेथेन्स' नावाचे घटक तयार होऊ शकतात. काही अभ्यासांनुसार, यांचा संबंध मूत्रमार्ग आणि आतड्यांशी संबंधित कर्करोगाच्या वाढत्या जोखमीशी जोडला गेला आहे.

याव्यतिरिक्त, नायट्रेट्स, 'पीएफएएस' आणि काही किरणोत्सर्गी घटकांचे दीर्घकाळ सेवन केल्यानेही कर्करोगाचा धोका वाढू शकतो.