पुढारी वृत्तसेवा
डिपर' (Dipper) हा पक्षी पक्ष्यांच्या दुनियेतील एक विलक्षण चमत्कार मानला जातो. हा पाण्याखाली फक्त पोहू शकत नाही, तर चक्क जमिनीवर चालल्यासारखा चालू शकतो.
याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो वेगाने वाहणाऱ्या नद्यांच्या तळाशी जाऊन अन्नाच्या शोधात चालू शकतो. पाण्याच्या प्रवाहाचा वेग कितीही असला, तरी तो कीटक शोधतो.
या पक्ष्याला 'डिपर' का म्हणतात? कारण हा पक्षी जेव्हा दगडावर बसलेला असतो, तेव्हा तो सतत आपले शरीर वर-खाली (Dipping) हलवत असतो. ते अतिशय मनोरंजक वाटते.
वॉटरप्रूफ पिसे: याच्या शेपटीजवळ एक ग्रंथी असते, ज्यातून निघणारे तेल तो आपल्या पिसांना लावतो, ज्यामुळे त्याचे शरीर ओले होत नाही.
पाण्याखाली स्पष्ट दिसण्यासाठी याला एक पारदर्शक 'तिसरी पापणी' असते, जी एखाद्या गॉगलप्रमाणे काम करते.
डिपरच्या रक्तामध्ये इतर पक्ष्यांच्या तुलनेत जास्त हिमोग्लोबिन असते, ज्यामुळे तो पाण्याखाली जास्त वेळ श्वास रोखून धरू शकतो.
डिपर पक्षी आपली घरटी अतिशय सुरक्षित जागी बांधतात. सहसा नद्यांच्या कडेला असलेल्या खडकांच्या भेगांमध्ये किंवा चक्क धबधब्याच्या मागे जिथे पाणी पडत असते तिथे.
हे पक्षी प्रामुख्याने पाण्यातील कीटक, अळ्या आणि लहान मासे खातात. थंडीच्या दिवसात जेव्हा नद्या गोठतात, तेव्हाही हे पक्षी बर्फाच्या खालून वाहणाऱ्या पाण्यात शिरून अन्नाचा शोध घेतात.
हा पक्षी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाण्यातच आढळतात. त्यामुळे एखाद्या नदीत डिपर पक्षी दिसत असतील, तर ती नदी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत शुद्ध असल्याचे मानले जाते.