Dhruv Jurel : वडिलांचा क्रिकेटला विरोध, पठ्ठ्यानं विंडिज विरुद्ध शतक ठोकून दिली ‘सलामी’

पुढारी वृत्तसेवा

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याने आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक पूर्ण केले.

त्याने १९० चेंडूंमध्ये हा पहिला कसोटी शतकी पल्ला गाठला आणि खास शैलीत जल्लोष साजरा केला.

आपले पहिले कसोटी शतक पूर्ण झाल्यानंतर जुरेलने खास पद्धतीने जल्लोष केला. त्याने आपले हे पहिले कसोटी शतक वडिलांना समर्पित केले. त्याने यापूर्वी अर्धशतक पूर्ण झाल्यावरही वडिलांना सॅल्यूट केला होता.

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे जन्मलेल्या ध्रुव जुरेलसाठी या स्तरावर पोहोचणे सोपे नव्हते. त्याची संघर्षाची कहाणी अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे.

ध्रुव जुरेला क्रिकेट बनावे यासाठी त्यांचे वडील नेम सिंग यांचा विरोध होता. ध्रुवने आपल्याप्रमाणेच देशाच्या सेवेत समर्पित व्हावे, अशी इच्छा होती.

ध्रुवचे वडील भारतीय सेनेत होते आणि त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता.

२००१ मध्ये ध्रुवचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते, परंतु तो वडिलांना घाबरत असे.

आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्याने स्विमिंग शिबिरातही जाण्यास सुरुवात केली, परंतु स्विमिंगपेक्षा त्याला क्रिकेटमध्ये अधिक रुची होती.

शाळेत स्विमिंगचे वर्ग सुरू असताना ध्रुव क्रिकेट खेळत असे. त्याला क्रिकेट इतके आवडू लागले की, त्याने स्विमिंगमधून आपले नाव काढून क्रिकेटसाठी नोंदवले.

जेव्हा त्याच्या वडिलांना ही बाब समजली, तेव्हा त्यांना खूप राग आला, परंतु नंतर त्यांनी होकार दिला. ध्रुवला जेव्हा क्रिकेट बॅट हवी होती, तेव्हा ती आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी मित्रांकडून ८०० रुपये कर्ज घेतले होते.

ध्रुव उत्तर प्रदेशसाठी १९ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट खेळला आहे.

त्यानंतर २०२० मध्ये त्याची निवड १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात झाली. येथून ध्रुवने कधीच मागे वळून पाहिले नाही.

२०२० मध्ये त्याला देशाच्या १९ वर्षांखालील संघाचा उपकर्णधार देखील बनवण्यात आले. त्याच्या संघाला १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक जिंकला. कारकिर्दीच्या सुरुवातीला ध्रुव ऑफ स्पिन गोलंदाजी करत असे, परंतु त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी नव्हती.

अशा परिस्थितीत त्याने यष्टिरक्षणात आपला हात आजमावला आणि या भूमिकेत त्याने सर्वांना प्रभावित केले. तो आता मध्यक्रम फलंदाजासह एक उत्तम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो.