Dharamkot : भारतात वसले आहे ‘मिनी इस्त्रायल’, दुकांनावरील पाट्याही हिब्रू भाषेत!

Namdev Gharal

भारतात हिमाचल प्रदेशात एक सुंदर गाव वसले आहे. या गावाची ओळख मिनी इस्त्रायल अशी निर्माण झाली आहे. या गावाचे नाव आहे धरम कोट Dharamkot

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील मॅक्लोडगंजजवळ 'धरमकोट' हे गाव वसले आहे हे एक छोटे आणि शांत गाव आहे. पण या गावाची ओळख देशात आणि परदेशात 'मिनी इस्त्रायल' म्हणून प्रसिद्ध आहे.

इस्त्रायलमध्ये प्रत्येक तरुणाला लष्करात काही वर्षे अनिवार्य सेवा द्यावी लागते. या कठीण सेवेतून मुक्त झाल्यानंतर, तिथले तरुण मनःशांती आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भारतात येतात.

या तरुणांना धरमकोटचे शांत वातावरण त्यांना प्रचंड आकर्षित करते. त्‍यामुळे अनेक इस्त्रायली तरुण याच गावात येऊन राहतात

त्‍यामुळे धरमकोटमध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला भारताऐवजी इस्त्रायलमध्ये असल्याचा भास होईल. येथील स्थानिक दुकाने, कॅफे आणि हॉटेल्सच्या पाट्यांवर हिंदी किंवा इंग्रजीसोबतच 'हिब्रू' (Hebrew) भाषेत लिहिलेले पाहायला मिळते.

येथील कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये अस्सल इस्त्रायली खाद्यपदार्थ मिळतात. हुमुस (Hummus), फलाफेल (Falafel), शाकशुका (Shakshuka) आणि लाफा (Lafa) यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.

धरमकोटमध्ये इस्त्रायली नागरिकांसाठी एक 'चाबाद हाऊस' (Chabad House) म्हणजेच ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आणि सांस्कृतिक केंद्र आहे.

येथे इस्त्रायली पर्यटक एकत्र येतात, त्यांचे सण साजरे करतात आणि धार्मिक विधी करतात. हे या गावाच्या इस्त्रायली कनेक्शनचे सर्वात मोठे केंद्र आहे.

हे गाव व्यावसायिक गर्दीपासून दूर असल्याने येथे कमालीची शांतता आहे. येथे मोठ्या प्रमाणावर ध्यान, विपश्यना आणि योगाचे केंद्रे आहेत. इस्त्रायली पर्यटकांना इथली 'हिप्पी लाईफस्टाईल' आणि अध्यात्माची आवड खूप आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इस्त्रायली पर्यटक येथे येत असल्यामुळे, धरमकोटमधील स्थानिक लोकांनाही हिब्रू भाषा बोलता येते.

स्थानिक संस्कृती आणि इस्त्रायली संस्कृतीचे एक सुंदर मिश्रण येथे पाहायला मिळते, ज्यामुळे परदेशी पर्यटकांना हे गाव त्यांच्या स्वतःच्या घरासारखे वाटते.