पुढारी वृत्तसेवा
संयुक्त अरब अमिराती आणि इतर अनेक देशांमध्ये गाढविणीच्या दुधाचे साबण मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.
गाढविणीच्या दुधात भरपूर प्रमाणात खनिजे आणि प्रथिने आढळतात, असा दावा केला जातो.
यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् देखील असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.
हा साबण त्वचेला सूर्यप्रकाश आणि वाढत्या वयामुळे होणारे परिणाम कमी करण्यास मदत करतो असा दावा केला जातो.
अटन डाँकी मिल्क सोप नावाच्या एका कंपनीने दावा केला आहे की, ते त्यांच्या फार्ममध्ये 100 टक्के नैसर्गकि साबण बनवतात.
जॉर्डनची राजधानी अम्मान येथे या कंपनीची उत्पादन कार्यशाळा आहे आणि तेथे गाढविणीच्या दुधाच्या साबणाला मोठी मागणी आहे.
दुबईमध्ये तर गाढविणीच्या दुधापासून बनवलेले विविध ब्रँडस्चे साबण मोठ्या प्रमाणावर विकले जातात.
मीडिया रिपोर्टनुसार, एका शोधामुळे माहिती मिळाली की, गाढविणीचे दूध त्वचेच्या पेशींना पुन्हा जिवंत करण्यास, एक्झिमा सारख्या त्वचेच्या समस्या बर्या करण्यास आणि वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यास मदत करते.
पर्यावरण कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त शिक्षक अल जुबी यांनी सांगितले की, गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाने आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग, मुरुमे आणि सुरकुत्या यांसारख्या समस्या कमी होतात.
हा साबण गाढविणीच्या दुधात ऑलिव्हचे तेल, बदामाचे तेल आणि नारळाचे तेल मिसळून तयार केला जातो.