Deepika Padukone baby bump : दीपिकाने फ्लॉन्ट केला बेबी बंप! ‘दुआ’च्या क्युट स्माईलने जिंकली मने

पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतेच तिने पती रणवीर सिंह आणि मुलगी दुआसोबत सुंदर मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

या फोटोशूटमध्ये दीपिका अभिमानाने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून, रणवीर आणि दीपिकाची चिमुरडी ‘दुआ’ आपल्या क्युट स्माईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

८ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मलेली दुआ आता दोन वर्षांची झाली आहे. लेकीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी रणवीर-दीपिकाने तिच्या चेहऱ्याची पहिली गोड झलक चाहत्यांसोबत शेअर केली.

हे संपूर्ण फोटोशूट क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट थीमवर करण्यात आले आहे. तिघांनीही मॅचिंग पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून, दोन वेण्या घातलेली दुआ अत्यंत गोंडस दिसत आहे.

हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले – “बेबी दुआ आणि आमचे हृदय आणखी मोठे होत आहे! तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.”

एका फोटोमध्ये रणवीर दीपिकाच्या बेबी बंपवर प्रेमाने हात ठेवताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये दुआ आई-बाबांच्या मध्ये आपला चेहरा लपवून लाजताना आणि हसताना दिसतेय.

या जोडप्याने एप्रिल २०२६ मध्ये एका खास पोस्टद्वारे दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. आता दुआ लवकरच ‘मोठी ताई’ बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

दीपिका आणि रणवीरने १४-१५ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये शाही विवाह केला होता. आता एका नव्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांचे कुटुंब लवकरच चौकोनी होणार आहे.

कामाच्या बाबतीत रणवीर शेवटचा आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या ब्लॉकबस्टर चित्रपटात भारतीय गुप्तहेर 'हमजा'च्या भूमिकेत दिसला होता. आता तो आगामी 'प्रलय' या चित्रपटात झळकणार आहे.

दीपिका पादुकोण लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार असून, ही जोडी सहाव्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती 'राका' या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत असेल.