पुढारी वृत्तसेवा
वनडे क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत मोजक्याच अशा खेळाडूंना अनेक आवृत्यांमध्ये आपल्या बॅटची कमाल दाखवता आली आहे.
वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्धशतक किंवा शतक फटकावणा-या अव्वल ५ फलंदाजांचा आढावा घेतला असता, यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळते.
सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावावर आहे.
मास्टर ब्लास्टरने वर्ल्ड कप कारकिर्दीत एकूण ४५ सामन्यांमधील ४४ डावांमध्ये फलंदाजी करताना ५६.९५ च्या उत्कृष्ट सरासरीने २,२७८ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान सचिन यांनी तब्बल २१ वेळा ५० हून अधिक धावांच्या खेळी साकारल्या आहेत.
विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३७ सामन्यांमधील ३७ डावांमध्ये ५९.८३ च्या सरासरीने १,७९५ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये एकूण १७ वेळा ५० हून अधिक धावांच्या खेळींची नोंद आहे. आगामी २०२७ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये विराट खेळल्यास, त्याला सचिन तेंडुलकर यांचा हा ऐतिहासिक विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असेल.
बांगलादेशचा शाकिब अल हसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ३६ सामन्यांमधील ३६ डावांमध्ये ४१.६२ च्या सरासरीने १,३३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या बॅटमधून १३ वेळा ५० हून अधिक धावांच्या खेळी पाहायला मिळाल्या आहेत.
रोहित शर्माने वर्ल्ड कपच्या अवघ्या २८ सामन्यांमध्ये ६०.५७ च्या अफाट सरासरीने १,५७५ धावा कुटल्या आहेत. रोहितने देखील या स्पर्धेत आतापर्यंत एकूण १३ वेळा ५० हून अधिक धावांच्या इनिंग्स खेळल्या आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण ३७ सामने खेळले आहेत. यातील ३५ डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळून त्यांनी ५६.७४ च्या सरासरीने १,५३२ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर १२ वेळा ५० हून अधिक धावांच्या खेळींची नोंद आहे.