पुढारी वृत्तसेवा
अनेक घरांमध्ये जेवण बनवताना घरातील सदस्यांच्या संख्येनुसार मोजून चपाती किंवा भाकरी बनवल्या जातात. अन्न वाया जाऊ नये किंवा ते कमी पडू नये, हा त्यामागचा व्यावहारिक दृष्टिकोन.
मात्र, वास्तू शास्त्राच्या मते ही सवय घरासाठी घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, अन्नाशी संबंधित आपल्या या छोट्या सवयींचा थेट परिणाम घराची बरकत आणि मानसिक शांततेवर होत असतो.
वास्तू शास्त्रानुसार, जेव्हा आपण चपाती किंवा भाकरी मोजून बनवतो, तेव्हा नकळतपणे आपण मनात 'अभावाची' किंवा 'कमतरतेची' भावना बाळगत असतो.
ही सवय अन्नाची देवता अन्नपूर्णा आणि धनदेवता लक्ष्मी यांचा अनादर मानली जाते.
असे मानले जाते की, ज्या घरात अन्नाचा हिशोब केला जातो, तिथे हळूहळू पैशांची चणचण जाणवू लागते. कितीही उत्पन्न मिळाले तरी खर्च वाढतात आणि बचत टिकत नाही.
चपाती किंवा भाकरी माजून वाढल्याने किंवा बनवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मकता वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण चिडचिड होणे, छोट्या गोष्टींवरून वाद आणि मानसिक तणाव वाढतात.
काय करावे?
नेहमी घरातील सदस्यांच्या गरजेपेक्षा किमान एक-दोन चपाती किंवा भाकरी जास्त बनवाव्यात. यामुळे घरात भरभराट राहते.
स्वयंपाक करताना मन शांत आणि आनंदी ठेवा. रागाच्या भरात केलेले अन्न घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करते.
भारतीय परंपरेनुसार, पहिली चपाती किंवा भाकरी गाईसाठी काढणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.
जर चपाती किंवा भाकरी उरल्या तर त्या कचऱ्यात न टाकता एखाद्या गरजूला किंवा प्राण्याला खाऊ घालाव्यात. अन्न वाया घालवणे हा वास्तू शास्त्रानुसार मोठा दोष मानला जातो.