Coatbuttons | दगडीपाला : निसर्गातील ओरिजनल ॲन्टिसेप्टिक- मुतखड्यासह, त्‍वचारोगावर अत्‍यंत गुणकारी!

Namdev Gharal

दगडी पाला हा सूर्यफूलाच्या कुलातील (Asteraceae) सदस्य आहे. या कुलातील वनस्पतींप्रमाणेच दगडी पाल्याच्या फुलांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. मूळची मध्य अमेरिकेतील असलेली ही वनस्पती आज भारतात सर्वत्र आढळते

कंबरमोडी, जखमजोडी, टणटणी, कुरुंद अशी मराठीमध्ये या वनस्पप्तीला विविध नावे असून, इंग्रजीमध्ये याला कोटबटन्स (Coatbuttons)म्हणतात , ही वनस्पती नैसर्गिक ॲन्टिसेप्टिक म्हणून काम करते.

हे जरी शेतकऱ्यांसाठी तण म्हणून उपद्रव करत असले तरी याचे औषधी उपयोग खूप आहेत. ग्रामीण व आयुर्वेदिक उपचार पद्धतीत दगडी पाल्याचा रस मुतखड्यावर उपयुक्त मानला जातो.

रानात किंवा शेतात काम करताना जखम झाल्यास या पानांचा रस काढून लावतात ताजी पाने कुस्करून लावले तर रक्तस्त्राव थांबतो, पानांचा रस जंतूंचा नाश करतो.

तोंडाला फोड आले किंवा जखमा झाल्यास याची पाने चघळल्याने फायदा होतो. मुरुमे, अल्सर व त्वचेच्या संसर्गावर पानांचा लेप उपयुक्त ठरतो.

पारंपारिक घरगुती उपचारात दगडी पाल्याचा सर्वाधिक उपयोग जखमा भरून काढण्यासाठी केला जातो. ताजी पाने स्वच्छ धुऊन त्यांचा रस काढून किंवा त्यांचा लेप करून जखमेवर लावण्याची पद्धत अनेक भागांत प्रचलित आहे.

किरकोळ रक्तस्त्राव कमी करणे, सूज कमी करणे आणि जखम लवकर भरून येण्यास मदत करणे, असे गुण या वनस्पतीला लोकपरंपरेत दिले गेले आहेत.

अनेक घरांमध्ये ही वनस्पती नैसर्गिक प्रथमोपचाराचा एक मुख्य भाग मानली जाते. काही भागांत त्वचेवरील पुरळ, फोड किंवा कीटकदंशावरही तिचा उपयोग केला जातो.

परंतु हे उपयोग पारंपरिक अनुभवांवर आधारित असून किरकोळ जखमांसाठी हे उपयुक्त आहे गंभीर जखमा किंवा संसर्गाच्या उपचारांसाठी आधुनिक वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.

आजच्या काळात औषधी वनस्पतींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत असताना दगडी पाल्यासारख्या सहज उपलब्ध वनस्पतींकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

Neem Leaves | file photo
Neems leavs