Most Expensive Dry fruit : सर्वात महागडा सुका मेवा 'चिलगोजा'! 10 हजार रुपये किलोपर्यंत विक्री

पुढारी वृत्तसेवा

सुका मेव्याचा राजा म्हणजे चिलगोजा. याला पाईन नटस्‌‍ असे नाव आहे. हिमाचल प्रदेशात, विशेषतः किन्नौर जिल्ह्यातील उंच पर्वतांमध्ये आढळणारा हा दुर्मीळ पाईन नट, जगातील सर्वात महागड्या सुका मेव्यापैकी एक आहे.

उत्तम दर्जाच्या किंवा जंगली जातींचा भाव 10 हजार रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. काही अहवालांनुसार तर हा भाव 12 हजार रुपये इतका आहे. तो काजूपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. या झाडाला फळे येण्यासाठी 20 ते 25 वर्षे लागतात.

एकदा शंकू तयार झाल्यावरही त्यांची काढणी करणे सोपे नसते. उंच आणि तीव्र कड्यांवर असलेले हे शंकू हातानेच काढावे लागतात.

हे एक जोखमीचे आणि कष्टाचे काम आहे. शंकू उन्हात वाळवणे, त्यातील बिया काढणे आणि हाताने त्यांची साल काढणे यासाठी अनेक महिने लागतात.

यामुळेच याचे उत्पादन खूप मर्यादित असून किंमत गगनाला भिडत आहे. स्थानिक बाजारपेठेतून हे नाहीसे होत आहे. अवैध वृक्षतोड आणि व्यापारामुळे या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

अलीकडेच हिमाचल प्रदेश सरकारने भूतानमध्ये याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील दबाव कमी करण्यासाठी 500 पाईन नटची रोपे आणि 50 किलो बियाणे पाठवले आहेत.

चिलगोजा केवळ महागच नाही, तर पोषक तत्त्वांचा खजिनासुद्धा आहे. त्यात आरोग्यदायी फॅटस्‌, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंटस्‌‍ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

त्वचा व केसांसाठीही ते फायदेशीर ठरते. आयुर्वेदात याला सुपरफूड मानले जाते. मात्र, त्याच्या जास्त किमतीमुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.