पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेदानुसार मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन महत्त्वाचे 'दोष' असतात. पित्त हा शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा द्रव घटक आहे. हा थोडा तेलकट, उष्ण आणि तीक्ष्ण गुणांचा असतो.
आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे आणि त्यातून शरीराला आवश्यक ते घटक तयार करणे हे पित्ताचे मुख्य काम आहे.
तहान लागणे, अन्नाची आवड निर्माण होणे, त्वचेचा रंग उजळणे, बुद्धिमत्ता, शौर्य व धैर्य टिकवून ठेवणे, दृष्टी उत्तम ठेवणे आणि अन्नातून रक्त तयार करणे, या सर्व प्रक्रिया पित्तामुळेच सुरळीत चालतात.
चमचमीत व मसालेदार पदार्थ: अति तिखट, मसालेदार, अति आंबट किंवा खारट पदार्थ, तळलेले पदार्थ, हिरवी मिरची, ठेचा/खरडा, शेंगदाणे आणि लोणची जास्त प्रमाणात खाणे.
आंबवलेले पदार्थ: दही, ताक, इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी, ब्रेड, चिंच, आंबट फळे आणि गरम मसाले (लवंग, मिरी, दालचिनी, आले, लसूण).
उत्तेजक व मांसाहारी पदार्थ: कोल्हापुरी कट-रस्सा, चहा, कॉफी, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा यांचे सतत सेवन. तसेच मासे, अंडी, मटण आणि चिकनचे नियमित सेवन.
अनेकदा सात्विक आहार घेऊनही पित्त वाढते. याचे कारण म्हणजे — अति चिंता, राग, भीती, मानसिक ताणतणाव आणि अती जबाबदाऱ्यांचा भार.
उन्हात किंवा उष्णतेजवळ सतत काम करणे, रात्री जागरण करणे आणि विशेषतः स्त्रियांमध्ये वारंवार कडक उपवास करणे यामुळेही शरीरात पित्त प्रकोपित होते.