Butcher bird: कसाई पक्षाच्या शिकारीची भयानक पद्धत पाहिलीत का?

पुढारी वृत्तसेवा

निसर्गाच्या अद्भूत दुनियेत अनेकदा आपण जे पाहतो, ते तसे असतेच असे नाही. दिसायला अत्यंत लहान आणि आपल्या सुमधुर आवाजाने भुरळ पाडणारा एक चिमुकला पक्षी प्रत्यक्षात मात्र क्रूर शिकारी असू शकतो, यावर तुमचा विश्वास बसेल?

‘बुचर बर्ड’ (कसाई पक्षी) म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी निसर्गाचा एक असाच थक्क करणारा विरोधाभास आहे.

अत्यंत निर्दयीपणे शिकार करणे आणि भक्ष्याला काट्यांवर टोचून त्याचा साठा करणे, या त्याच्या भयानक सवयीमुळे त्याला हे नाव पडले आहे.

या पक्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुमधुर आवाज आणि त्याची क्रूर कृत्ये यांमधील विरोधाभास! ऐकायला जितका गोड, तितकाच कर्माने हा पक्षी कमालीचा निर्दयी आहे.

BJORNBURTON

हा पक्षी केवळ शिकार करून तात्काळ पोट भरण्यावर विश्वास ठेवत नाही, तर तो आपल्या भक्ष्याची साठवणूक करण्यासाठी झाडाच्या काट्यांचा किंवा अणकुचीदार फांद्यांचा वापर करून एक प्रकारची अन्नाचे कोठार तयार करतो.

या कोठारात त्याने मारलेल्या जीवांचे अवशेष काट्यांवर टोचलेले पाहायला मिळतात. कीटक, लहान सरपटणारे प्राणी किंवा इतर लहान पक्षी काट्यांमध्ये अडकवून ठेवलेले दिसतात.

शास्त्रज्ञांच्या मते, ही वागणूक म्हणजे या पक्षाचा कोणताही क्रूरपणा नसून, ती त्याच्या जगण्याची एक व्यावहारिक रणनीती आहे.

जेव्हा शिकार भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, तेव्हा गरजेपेक्षा जास्त मिळालेले अन्न हा पक्षी भविष्यासाठी राखून ठेवतो.

काट्यांचा वापर तो हुकासारखा करतो. मात्र, त्याची ही अन्न साठवण्याची पद्धत अतिशय भयानक असल्याने त्याला ‘बुचर बर्ड’ हे नाव पूर्णपणे सार्थ ठरते.