पुढारी वृत्तसेवा
तांदूळ हा भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य भाग आहे. पण अतिप्रमाणात भात खाल्यामुळे शुगर, वजन वाढणे असे त्रास होऊ शकतात यासाठी ब्राऊन राईस हा चांगला पर्याय मानला जातो
ब्राऊन राईस (Brown Rice) हा पांढऱ्या तांदळापेक्षा अत्यंत पौष्टिक मानला जातो, कारण त्यावर जास्त प्रक्रिया केलेली नसते. तो कसा तयार होतो आणि त्याचे आपल्या आरोग्याला काय फायदे होतात हे पाहू
आपल्या रोज वापरातील भाता पासूनच ब्राऊन राईस केला जातो. धान किंवा भात शेतातून काढल्यानंतर तांदळाच्या दाण्यावर प्रामुख्याने तीन थर असतात
१. टरफल (Husk): सर्वात बाहेरील कडक कवच, २. कोंडा (Bran): फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेला मधला थर, ३. जर्म (Germ): जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला सर्वात आतील गाभा
ब्राऊन राईस म्हणजे शेतातून आणलेल्या धानाची फक्त बाहेरील कडक साल (Husk) मशीनद्वारे काढून टाकली जाते
बाहेरील कवच काढल्यानंतरही तांदळावर कोंडा (Bran) आणि जर्म (Germ) चा थर तसाच राहतो. या थरांमुळेच तांदळाला हलका तपकिरी (ब्राऊन) रंग येतो. हाच ब्राऊन राईस
जर हा कोंडा आणि जर्म देखील पॉलिशनिंग करून काढून टाकला, तर मऊ आणि पांढरा तांदूळ (White Rice) तयार होतो. म्हणजेच, कमी प्रक्रिया केल्यामुळे ब्राऊन राईसमधील नैसर्गिक पोषक तत्वे टिकून राहतात
ब्राऊन राईस खाण्याचे फायदे
ब्राऊन राईसमध्ये फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक लवकर लागत नाही ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते
ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) पांढऱ्या तांदळापेक्षा कमी असतो. याचा अर्थ असा की हा तांदूळ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही, तर ती नियंत्रणात राहते.
यातील फायबर आणि 'लिग्नॅन्स' (Lignans) नावाचे घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे ब्लॉकेजेस आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
यात शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.