Brinjal Buying Tips: वांगी खरेदी करताना ताजी आणि बिनबियांची कशी ओळखावीत?
पुढारी वृत्तसेवा
वांगी खरेदी केल्यानंतर अनेकांची फजिती होते. कापल्यावर त्यात कीड किंवा खूप बिया निघतात? म्हणूनच प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी सांगितलेल्या या ट्रिक्स वापरा.
त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, वांगे न कापता ते ताजे आणि बिनबियांचे आहे की नाही, हे ओळखण्याच्या सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.
वांगे खरेदी करताना दोन सारख्या आकाराची वांगी हातात घ्या. जे वांगे वजनाला हलके लागेल, तेच निवडा.
वांगे जितके हलके, तितक्या त्यात बिया कमी असतात. जड वांग्यांमध्ये बिया जास्त असतात आणि ती चवीला कडवट लागतात.
वांग्याची साल नेहमी घट्ट आणि चमकदार असावी. चमकदार वांगी ताजी असतात.
ज्या वांग्याची साल सुरकुतलेली किंवा निस्तेज दिसते, ती शिळी असतात. त्यावर तपकिरी डाग असल्यास ते जास्त पिकलेले असून त्यात कीड असू शकते.
नेहमी गडद जांभळ्या रंगाचीच वांगी निवडावीत. फिकट किंवा रंग उडालेली वांगी शिळी झालेली असतात आणि त्यात कीड असू शकते.
खूप मोठ्या आकाराची वांगी खरेदी करणे टाळा. मोठ्या वांग्यांमध्ये बियांचे प्रमाण जास्त असते.
नेहमी मध्यम किंवा लहान आकाराची वांगी घ्या. ही वांगी चवीला गोड लागतात आणि भरीतासाठी किंवा भाजीसाठी उत्तम असतात.
वांगी खरेदी करताना या युक्तींच्या मदतीने, आता तुम्ही वांगे कापून न पाहताच ते चांगले आहे की नाही, हे ओळखू शकता.