पुढारी वृत्तसेवा
मानवी मेंदूतील स्मृती केंद्र (मेमरी सेंटर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिप्पोकॅम्पस’मधील मज्जासंस्थेचे जाळे सुरुवातीला अत्यंत दाट आणि विस्कळीत असते.
मात्र, वयानुसार हे जाळे अधिक विरळ, पण अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षम होते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑस्ट्रिया (आयएसटीए) येथील संशोधकांनी केलेला एक अभ्यास समोर आला आहे.
या अभ्यासानुसार सामान्यतः आपल्याला असे वाटते की, वय वाढेल तसे मेंदूतील मज्जासंस्थेचे जाळे अधिक दाट होत असेल. वास्तवात याच्या उलट प्रक्रिया घडते.
माणसाच्या सुरुवातीच्या वयात मज्जासंस्थेतील जोडण्या (कनेक्शन) खूप दाट आणि विखुरलेल्या असतात.
माणूस जसजसा प्रौढ होत जातो, तसतसे मेंदू अनावश्यक जोडण्या काढून टाकतो.
यालाच प्रूनिंग मॉडेल असे म्हणतात. यामुळे मेंदूचे जाळे अधिक सुटसुटीत, शिस्तबद्ध आणि माहिती साठवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम बनते.
हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा असा भाग आहे, जो अल्पकालीन स्मृतींचे (शॉर्ट टर्म मेमरी) दीर्घकालीन स्मृतींमध्ये रूपांतर करणे, एखाद्या ठिकाणाचा रस्ता लक्षात ठेवणे किंवा दिशा ओळखणे ही कामे करतो.