रणजित गायकवाड
ब्लॅक फ्रायडे सेलची चर्चा जगभर असते. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांमध्ये या सेलचे प्रचंड आकर्षण असते.
हा ब्लॅक (काळा) दिवस म्हणून का ओळखला जातो, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
या सेलचे नाव ऐकले की, मोठे डिस्काऊंटस्, शॉपिंग मॉल्समधील प्रचंड गर्दी आणि ऑनलाईन वेबसाईटस् क्रॅश होण्याचे चित्र डोळ्यासमोर येते.
हा सेल केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात खूप लोकप्रिय आहे. जगभरातील कोट्यवधी लोक ब्लॅक फ्रायडे सेलची आतुरतेने वाट पाहत असतात.
ब्लॅक फ्रायडेचा इतिहास अमेरिकेतील आहे. हा दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी असतो, जो अमेरिकेतील ‘थँक्सगिव्हिंग’ (नोव्हेंबरचा चौथा गुरुवार) या सणाच्या दुसऱ्या दिवशी येतो.
‘थँक्सगिव्हिंग’ हा अमेरिकेतील मोठा सण असून, पारंपरिकरीत्या या दिवसापासून ख्रिसमसच्या खरेदीच्या हंगामाची अनौपचारिक सुरुवात होते.
किरकोळ विक्रेते या दिवशी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलत देतात. ब्लॅक फ्रायडे या शब्दाचा वापर 1950 च्या दशकात फिलाडेल्फियामधील पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम केला होता.
‘थँक्सगिव्हिंग’नंतर शहरात होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती दर्शवण्यासाठी हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला गेला होता.
1980 च्या दशकात, किरकोळ विक्रेत्यांनी या शब्दाला सकारात्मक अर्थ दिला. त्यांनी सांगितले की, हा तो दिवस आहे, जेव्हा अनेक स्टोअर्स तोट्यातून बाहेर पडून नफ्यात येतात आणि काही दिवसांतच दुकानदार वर्षभराची कमाई करू लागतात.